सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

सोलापूर, दि.13– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने सन २०१५ पासून दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. यासाठी प्रस्ताव मागण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली. १ ऑगस्ट रोजी वर्धापन दिनी ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण आणि संशोधन, सामाजिक,राजकीय, कृषी, उद्योग व व्यापार, पत्रकारिता आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोलापूर जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या पात्र व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी वरील क्षेत्रातील मान्यवराचे/ व्यक्तीचे नामनिर्देशन आणि शिफारस प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करण्याचे प्रक्रिया सुरु आहे. हे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 आहे. शासनमान्य संस्थांचे प्रमुख, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा व विद्वत सभेचे सदस्य योग्य व्यक्तीचे नामांकन आणि शिफारस करू शकतात. नामांकन करणारी व्यक्ती फक्त एकाच योग्य व्यक्तीची शिफारस करू शकणार आहे. तसेच व्यक्तीला स्वत:देखील अर्ज करता येईल, अशी माहितीही घुटे यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!