सोलापूर विद्यापीठाच्या 243 कोटी 35 लाख ₹ अंदाजपत्रकास अधिसभेची मंजुरी

विद्यार्थी विकास व संशोधनासाठी भरीव तरतूद

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 208 कोटी 64 लाख 39 हजार 22 रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा धरून 243 कोटी 35 लाख 66 हजार 812 रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने दुरुस्तीसह मान्यता दिली. या अंदाजपत्रकात 34 कोटी 71 लाख 27 हजार 790 रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.

गुरुवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची 22 वी बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. कीर्ती पांडे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सचिव म्हणून कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी काम पाहिले.

विद्यापीठाच्या या अंदाजपत्रकाची प्रामुख्याने पाच टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. देखभाल, वेतन, ऋण आणि अनामत, योजना अंतर्गत विकास -भाग एक तसेच योजना अंतर्गत विकास- भाग दोन अशा पाच टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच संशोधन कार्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकावर सदस्यांनी चर्चा करून त्यास दुरुस्तीसह मान्यता दिली.

अधिसभेच्या बैठकीत सुरुवातीला कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर केला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पार पडला. अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानंतर सदस्यांनी काही ठराव मांडले. यावेळी सदस्य अब्राहिम आवळे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डिलीट पदवी देण्याचा ठराव मांडला. त्यास अन्य सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून ठरावास मान्यता दिली. त्याचबरोबर विविध ठरावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. विद्यापीठ गीताने सभेची सुरुवात झाली तर ‘वंदे मातरम’ने सभेची सांगता झाली.

अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे
* संशोधन कार्याला चालना मिळण्यासाठी व उद्योजक पिढी निर्माण करण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरसाठी एक कोटी रुपयांची तरतूद.
* सीड मनी संशोधन उपक्रमाकरिता 17 लाख 50 हजार रुपयांची तरतूद.
* मुली शिकवा, समाज घडवा अभियानाकरिता चार लाख रुपयांची तरतूद.
* कमवा शिका योजनेसाठी 12 लाख रुपयांची तरतूद.
* विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देणाऱ्या युवा महोत्सवासाठी 30 लाख रुपयांची तरतूद.
* विशेष संशोधन कार्य याकरिता दोन लाख रुपयांची तरतूद.
* ऑनलाईन प्रश्नपत्रिका यासाठी वीस लाख रुपयांची तरतूद.
* दिव्यांगांसाठी 75 लाख रुपयांची तरतूद.
* विद्यापीठातील प्रत्येक स्कूलमधील ग्रंथालयासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची तरतूद.
* कौशल्य विकास सेंटरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी निधीची तरतूद.
* वृक्षारोपणासाठी भरीव निधीची तरतूद.
* रंगभवन येथील विद्यापीठाच्या केंद्रातील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद.
* वैद्यकीय उपकरणे व साहित्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद.
* विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्याकरिता विविध उपक्रमासाठी विशेष निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!