स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची आता जम्मूमध्ये शाखा ; २६ फेब्रुवारीला स्वा. वि. दा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी खास कार्यक्रम
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाला २६ फेब्रुवारी २०२१ यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांची जम्मूमध्ये शाखा सुरू केली जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना सिंधु नदीपासून सिंधु सागरापर्यंत व्यापक करण्याचा उद्देश यामागे आहे.
‘ सिंधु नदी से सिंधु सागरतक स्वातंत्र्यवीरोंकी बात’ ( सिंधु नदीपासून ते सिंधु सागरापर्यंत विषय स्वातंत्र्यवीरांचाच!) अशा घोषवाक्याच्या उद्देशातून जम्मूमधील ही शाखा सुरू केली जात आहे.
स्वा. सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य अखंड भारताच्या निर्मितीसाठी वेचले. वयाच्या पंधराव्या वर्षी नाशिकनजीकच्या भगूर या आपल्या मूळ निवासस्थान असलेल्या गावामधून त्यांनी देशकार्याचा विडाच उचलला होता. त्यासाठी त्यांनी इतक्या यातना सहन केल्या की, पन्नास वर्षांच्या दुहेरी जन्मठेपेच्या शिक्षेलाही ते सामोरे गेले. अंदमानातील तुरुंगामध्ये अमानवी अशा छळालाही त्यांनी झेलले.
क्रांतिकार्यासाठी जगभरात स्वा. सावरकर यांनी फिरून तसेच भारताच्या सर्व भागात जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी सभा घेतल्या. त्यांच्या या मोहिमांमध्ये जुलै १९४२ मध्ये त्यांनी जम्मूलाही भेट दिली होती. तेव्हा त्यांचे मोठे जल्लोषात स्वागत केले गेले. त्यावेळच्या राजानेही तेथे त्यांचे स्वागत केले, त्यांच्या कार्याची स्तुती केली होती. अशा या जम्मूसारख्या एका ऐतिहासिक ठिकाणी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शाखेची स्थापना होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जम्मूमधील त्या भेटीला आता ७९ वर्षे होत असून या मोठ्या कालावधीत जम्मू- काश्मीरमध्ये मोठमोठे बदल झाले. या दरम्यानच्या काळात ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी राज्यात लागू असणारे कलम ३७० आणि ३५ ए संपुष्टात आणले गेले.
या राज्यातील या विद्यमान जनतेला व त्यांच्या नव्या पिढीला देशाच्या मुख्य प्रवाहात सामावता यावे, बळकट करावे आणि भारताच्या ऐतिहासिक संपत्तीला समृद्ध करता यावे या उद्दिष्टातून जम्मू येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईची शाखा सुरू करण्यात येत आहे. जम्मूची ही शाखा सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्निल सावरकर यांच्या उपस्थितीत स्थापन केली जाईल.
सावरकरांची तीन गाणी नव्या पिढीकडून सादर
यानिमित्ताने स्वा. सावरकर यांची दोन हिंदी गीते नव्या स्वरूपात सादर केली आहेत. यू-ट्यूबवर ती प्रक्षेपित केली जाणार आहेत. यामध्ये ‘जयोस्तुते’ हे आर्या आंबेकर यांनी गायले आहे तर ‘अनादी मी’ जयदीप वैद्य यांनी गायले आहे. ही दोन्ही गाणी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यानी भाषांतरित केली आहेत. या दोनही गाण्याचे संगीतकार वर्षा भावे आणि संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर आहेत.