स्वेरीत ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन सेल’ व ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग लॅब’तर्फे ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम
पंढरपूर– गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन सेल’ (आय. आय. सी.) व ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग लॅब’ या विभागांकडून मोफत ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नुकताच संपन्न झाला.
कोरोनासारख्या महामारीमधील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन सेल’ व ‘रिव्हर्स इंजिनिरिंग लॅब’ या विभागांकडून दोन दिवसांच्या कालावधीमध्ये ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ या विषयावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील वस्तूनिर्माण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहनुसार आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे गरजेचे असते. येत्या दशकामध्ये वस्तू निर्माण क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यामधील संशोधन व उपलब्ध संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील एकूण २५० जणांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. नवनाथ पासलकर यांच्या मार्गदर्शनाने आणि स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी रोंगे यांच्या मनोगताने कार्यशाळेला सुरूवात झाली. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आय.आय.सी.चे तांत्रिक सल्लागार बी. एम. हिरवे आणि अशोक सराफ यांनी ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग करण्याची गरज आणि योग्य पद्धत’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आय.आय.सी.चे तांत्रिक सल्लागार सुदर्शन नातू व सुहास देशपांडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा ही गुगल मीट ॲपद्वारे व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आली. शेवटच्या सत्रामध्ये सहभागी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत अनुभवी मान्यवरांमार्फत बहुमोल मार्गदर्शन उपलब्ध करुन दिल्याबद्दल कौतुक केले. लॉकडाऊनच्या कालावधी मध्ये आयोजिलेली ही मोफत ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. चंद्रकांत व्हरे यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले तर तांत्रिक व इतर व्यवस्थापन डॉ. सोमनाथ ठिगळे, प्रा. सचिन भोसले, प्रा. ओंकार महाजन, प्रा. अनिल टेकळे, प्रा. एम. बी. कुलकर्णी, प्रा. ए. बी. कोकरे, प्रा. स्वागत कर्वे आणि बालाजी सुरवसे यांनी पाहिले.