अखेर शरद पवार हेच महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय पातळीवर वर ही नवी समीकरण तयार होणार

प्रशांत आराध्ये

पंढरपूर-  2019 ची विधानसभा निवडणूक ही मावळते मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पैलवानकीच्या मुद्द्यावरून खूप गाजविली. ते सतत म्हणायचे या आखाड्यात तोडीचा पैलवान आपल्या समोर नाही , मात्र त्यांचे आव्हानं 80 वर्षीय शरद पवार यांनी स्वीकारले आणि निवडणूक रणधुमाळी  व यानंतर सत्तास्थापनेचा संघर्ष, स्वपक्षात पडू पाहणारी फूट यावर मात करत भाजपा व फडणवीस यांना अखेर सत्तेपासून दूर करून आपणच महाराष्ट्र केसरी असल्याचे सिध्द करून दाखविले. दरम्यान महाराष्ट्रात होत असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाने देश पातळीवर ही अनेक राजकीय समीकरण बदलू शकतील व याचे श्रेय शरद पवार यांच्याकडे जाईल.विधानसभा निवडणुकीत काँगे्रस व राष्ट्रवादी या पक्षांची अवस्था सुरूवातीला केवीलवाणी होती. यानंतर शरद पवार यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला. या निवडणुकीत त्यांना अनेक स्वपक्षीय मंडळींनी रामराम ठोकला पण याचा विचार पवारांनी केला नाही व त्यांनी जो प्रचार केला याचा परिणाम म्हणजे दोन्ही काँग्रेसला मिळून शंभरच्या आसपास आमदार निवडून आणता आले. सातारा लोकसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली व पवार यांनी आपली ताकद दाखवून दिली. शिवसेना व भाजपाची निवडणूक पूर्व युती होती मात्र तेथे सत्तासंघर्ष ही मोठा होता. याची जाणीव पवार यांना होती. भाजपा  आपला विस्तार करण्यासाठी शिवसेनेचा व पर्यायाने उध्दव ठाकरे यांच्या मवाळ भूमिकेचा वापर करून घेत होती हे त्यांच्या लक्षात आले होते. ज्यावेळी भाजपाने शिवसेनेला विधानसभेच्या केवळ 124 जागा सोडल्या यावरून तर भाजपाची ताठर भूमिका सार्‍यांच्याच लक्षात येत होती.निवडणूक निकाल लागल्यावर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी तो सत्तास्थापन करू शकत नव्हता. तर मित्र असणार्‍या अपक्षांची संख्या ही 15 च्या आसपास राहिल्याने फडणवीस यांची सारी भिस्त ही शिवसेनेवर होती. याच दरम्यान सूत्र फिरली व शिवसेना व राष्ट्रवादीची अंतर्गत मैत्री वाढल्याचे दिसून आले. पवार हे सतत शिवसेना व भाजपा यांनी एकत्रित येवून सरकार स्थापन करावे असे सांगत होते मात्र त्याच वेळी ते शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ही भेट देवून चर्चा करत होते. शिवसेनेने भाजपाला मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. सत्तेत अर्धा वाटा मागितला. मात्र भाजपाने याकडे दुर्लक्ष केले व याच दरम्यान भाजपा विरहित सरकारची संकल्पना पुढे आली. देशपातळीवर ही असाच प्रयोग अनेक प्रादेशिक पक्षांना हवा आहे. अडचण होती ती काँगे्रसची. शिवसेनेबरोबर हा पक्ष येण्यास राजी नव्हता. मात्र शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेवून यावर ही तोडगा शोधला.यानंतर भाजपा जागा झाला व त्यांनी ही सत्तेची चाचपणी सुरू केली. तोवर राष्ट्रपती राजवट लागली होती. ज्या शरद पवार यांनी राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची नीती अवलंबली होती त्यांचाच पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देवून सत्ता बनविली मात्र याचा आनंद केवळ तीन दिवस घेता आला. शरद पवार यांनी आपली पक्षावरील मजबूत पकड दाखवून देत पुन्हा सर्व आमदार आपल्या बाजूला वळविले. यात बहुमत चाचणी संदर्भात सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार यांनी मंगळवारी वैयक्तिक कारणास्तव उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला व यापाठोपाठ भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पायउतार होणे पसंत केले. पक्षफुटीच्या संकटकाळात ही शरद पवार यांनी अतिशय शांतपणे सार्‍या बाबी हाताळल्या व आपण देशाच्या राजकारणातील चाणक्य असल्याचे पुन्हा दाखवून दिले.वास्तविक पाहता शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. मध्यंतरी संसद भवनात अवकाळी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पवार व मोदी यांची पाऊण तास भेट झाली होती. यास माध्यमांनी महाराष्ट्राच्या राजकीय सत्तासंघर्षाशी जोडले होते. मात्र पवार यांनी दोन्ही काँगे्रस व शिवसेना यांची एकजूट करून महाविकास आघाडीची आपली संकल्पना कायम ठेवली होती.  भाजपाने अनेक राज्यात बहुमत नसताना ही सत्ता मिळविल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात ही सत्ता मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे लपून राहिलेले नाही. त्यांना अन्य पक्षातून काही मंडळी फुटून येवून आपण सरकार बनवू असा विश्‍वास होता व अजित पवार यांनी त्यांना दिलेला पाठिंबा बरेच काही सांगून जात होता. मात्र हा प्रयोग शरद पवार यांनी अयशस्वी करून दाखविला. याचे पडसाद आता देशाच्या राजकारणात ही पडणार हे निश्‍चित आहे. अनेक राज्यांमध्ये बिगर भाजपा सरकारसाठी प्रयत्न होतील. आज एनडीए मधील घटक पक्ष ही भाजपाच्या विस्तारवाढीला कंटाळून स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या या बदलत्या परिस्थितीतून बरेच बोध मिळतील हे निश्‍चित.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!