आधी कोरोना तर आता पुरामुळे पंढरीतील व्यापारी आणि गोरगरीबांना आर्थिक फटका, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

पंढरपूर- मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडॉऊन पुकारण्यात आले होते. तेंव्हापासून पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद असल्याने येथील व्यापार ठप्प होता. आता अनलॉक सुरू झाले आणि दुकाने उघडली जात असतानाच अतिवृष्टी व भीमेच्या महापुराचा आर्थिक फटका दुकानदारांसह नदीकाठच्या वसाहतीमधील गोरगरीब तसेच हातावर पोट असणार्‍यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सप्टेंबर, आँक्टोंबर महिन्यात सलग अतिवृष्टी व कालच्या पुराने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सप्टेंबर, आँक्टोंबर महिन्यात सलग अतिवृष्टी व कालच्या पुराने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
(दोन दिवसापूर्वी पंढरीत आलेले भीमेच्या पुराचे पाणी अनेक दुकानांमध्ये शिरले होते.)

तीर्थक्षेत्र पंढरपूरचे अर्थकारण हे यात्रा व उत्सवावर चालते. प्रत्येक महिन्याच्या दोन एकादशी तसेच अन्य उत्सव, आषाढीसह चार मोठ्या यात्रांमध्ये लाखो भाविक येतात व यातून येथील व्यवसाय फुलतो. कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मार्च महिन्यात भाविकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी मंदिर बंद करण्यात आले. याचवेळी चैत्री यात्रा होती मात्र ती झाली नाही. आषाढी जी सर्वाधिक व्यापाराची संधी देते ती यात्राच कोरोनामुळे रद्द झाली. अनेक सण उत्सव या काळात मात्र मंदिर बंद राहिले आणि यानंतर आला तो अधिक महिना ज्यास पुरूषोत्तम मास म्हणून संबोधले जाते. तीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक यंदा मंदिराचे दरवाजे बंद असल्याने थंडच गेला. यानंतर नवरात्र सुरू झाले मात्र मंदिर उघडण्याचा निर्णय झाला नाही.

राज्यात आता अनलॉक सुरू होत असताना मंदिर उघडण्याची अपेक्षा सर्वांना आहे. मात्र तोवर निर्सगाने आपले रौद्र रूप दाखविले आणि चित्रा नक्षत्राचा सलग पाच दिवस पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने अतिवृष्टी झाली आणि पंढरपूर शहराने बुधवार 14 ऑक्टोंबर रोजी 157 मिलीमीटर पाऊस एकाच दिवसात अनुभवला. उजनी, वीर व पावसाच्या पाण्याने भीमा नदीला पूर आला. अनेक सखल भागात पाणी शिरले. गोरगरीबांच्या वसाहती पाण्याखाली गेल्या याच बरोबर प्रदक्षिणा मार्गासह इतरत्र अनेक दुकान व घरांमध्ये पाणी शिरले आणि अतोनात नुकसान यात झाले आहे. या पावसाने कुंभार घाटाजवळ नवीन घाटबांधकामाची भिंत कोसळून सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

कोरोनामुळे पंढरपूरमधील अनेक छोटेमोठे व्यवसाय ठप्प होते. अर्थकारण बिघडल्याने बांधकाम, वस्तू निर्मितीक्षेत्रातील कामे बंद आहेत. बचतगटांसमोर आर्थिक समस्या आहेत. गेले सात महिने कोरोनाचा कहर आहे. पंढरपूर शहरात सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. येथे उपचारासाठी अनेकांना आपले खिसे रिकामे करावे लागले आहेत. अशात अतिवृष्टी व महापुराने पंढरीचे अर्थकारण पार बिघडले आहे.

पंढरपूर हे मंदिरावर अवलंबून असणारे गाव आहे. याच्या जीवावर अनेक दुकाने चालतात , तसेच छोटे छोटे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला थांबून चार पैसे कमवतात मात्र कोरोनामुळे सारेच ठप्प आहे. यातच आता निसर्गाने पुराचा झटका दिला आहे.

अतिवृष्टीचा शेतीला सलग दुसर्‍यांदा फटका

सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होवून कासाळ ओढ्याकाठासह अन्यत्र शेतीचे मोठे नुकसान झाले होते. कासेगाव, खर्डी व इतर गावांमध्ये पावसाने थैमान घातले होते. यात फळबागांसह , भाज्या, खरीप पिके व उसाचे नुकसान झाले होते. यापाठोपाठ आता ऑक्टोंबर महिन्यात पुन्हा पंढरपूर शहर व तालुक्याला पावसाने झोडपले. विक्रमी पाऊस झाला. मात्र अतिपावसाने पीक जमीनदोस्त झाली. काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. ऊस, फळबागांसाठी नगदी पीक धोक्यात आली. यातच भीमाकाठी महापुराने थैमान घातले होते. नदीकाठावरील अनेक गावांमध्ये शेतात व ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले होते. राज्य सरकारने आता पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक मंत्री दौरा करून पाहणी करत आहेत. यावर्षात कोरोनामुळे अगोदरच अर्थकारण धोक्यात आले असताना अतिवृष्टीने ग्रामीण भागात अतोनात नुकसान केले आहे. अनेक गावांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरून मोठा आर्थिक फटका बसला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!