ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार: मुख्यमंत्री

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही

मुंबई : ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

आज ओबीसी समाजाच्यावतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,  परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने  ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची  प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने  निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. मुख्यमंत्री म्हणाले की, टप्प्या टप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू.  कोरोना मुळे लॉकडाऊन लागले आणि त्यामुळे कामांची गती मंदावून आरोग्य या विषयाची प्राथमिकता वाढली. आता आपण अनलॉक प्रक्रियेमध्ये जीवनाला पुन्हा गती देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीत अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार  यांनी  तसेच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह उपस्थित ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!