कोरोना प्रतिबंधासाठी पंढरीत अन्नछत्र व तुळशी वृंदावन बंद, आठवडा बाजार रद्द

पंढरपूर,दि.16- कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी प्रशासन अनेक उपाय योजना करत असून राज्यात सर्वत्र गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात ही याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून याच अंतर्गत तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने चालविण्यात येणारे अन्नछत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच बरोबर येथील वन विभागाने उभारलेले व भाविकांचे आकर्षण असणारे यमाई तलावावरील तुळशी वृंदावन ही मंगळवारपासून बंद ठेवले जात आहे.
याबाबत बोलताना कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 ची अंमलबजावणी होत असून याच अंतर्गत कोठे ही नागरिकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रात रोज सकाळी अकरा ते दुपारी दोन या दोन तासात सुमारे दीड ते दोन हजार भाविक प्रसादासाठी येत असतात. यामुळे येथे गर्दी होत असल्याने हे अन्नछत्र आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाविकांची गैरसोय होवू नये याची दक्षता घेतली जात असून मंदिरे समितीच्या वतीने भाविकांना फूड पॅकेटद्वारे हा प्रसाद दिला जाणार आहे. हा प्रसाद भक्तांनी स्वीकारावा व गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून खावा असे आवाह करण्यात येत आहे.
दरम्यान पंढरीत येणारे भाविक येथील यमाई तलावावरील तुळशी वृंदावन पाहण्यासाठी येतात. येथे होत असलेली गर्दी पाहता हे तुळशी वृंदावन ही मंगळवार पासून बंद ठेवले जाणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. नागरिकांत कोरोनाबाबतच्या प्रतिबंधासाठी शहरात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. दरम्यान नगरपरिषदेने उद्या मंगळवारी भरणारा पंढरपूरचा बाजार ही रद्द केला आहे.

कोरोना विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून दुसर्‍या व्यक्तिस संपर्कामुळे होत असते. यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील आवश्यक किराणा माल, भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू, औषधालये वगळून इतर गर्दी होणारी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नगरापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश संबधितांना देण्यात आले आहेत. शहरातील जलतरण तलाव बंद करण्याच्या सूचनाही दिल्याचे मानोरकर यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!