पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आवताडे आणि भालके उतरले, परिचारक गट मात्र यंदा भाजपासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

पंढरपूर- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अगोदर भाजपाने तर सोमवारी राष्ट्रवादीने उमेदवाराची घोषणा केली. ही लढत भाजपाचे समाधान आवताडे व राष्ट्रवादीचे युवा नेते भगिरथ भालके यांच्यात होणार हे आता निश्‍चित झाले आहे. दरम्यान या निवडणुकीत 2009 नंतर प्रथमच परिचारक गट नसणार आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद आवताडे यांच्या पाठीशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर भगिरथ भालके यांची ही पहिलीच विधानसभेची लढत आहे.

कै.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी चुरशीची लढत होत असून यात सोलापूर जिल्ह्यातील सहकार व राजकारणातील प्रबळ मानला जाणार्‍या परिचारक गटाने आपली उमेदवारी दिलेली नाही. यापूर्वी 2009 ला कै.सुधाकरपंत परिचारक हे राष्ट्रवादीत असताना त्यांनी आपला मतदारसंघ तत्कालीन पक्षाचे नेते व परिचारकांचे अत्यंत निकटवर्तीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी सोडली होती. मात्र मोहिते पाटील यांचा भारत भालके यांनी पराभव केला व यानंतर सतत तीन वेळा भालके येथून विजयी झाले. या दरम्यान 2014 ला भाजपाप्रणित महायुतीकडून प्रशांत परिचारक तर 2019 ला सुधाकरपंत परिचारक यांचा सामना भालकेंशी झाला मात्र परिचारक विजयी होवू शकले नाहीत. या दोन्ही निवडणुकीत समाधान आवताडे हे क्रमांक तीनवर राहिले होते. ते पहिल्यांदा शिवसेनेकडून तर नंतर अपक्ष लढले होते.

आता 2021 च्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीकडून कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. येथील तुल्यबळ लढत दुरंगी होत आहे. मात्र या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक अथवा परिचारक घराण्यातील कोणीही उमेदवार नाही. नुकतेच सुधाकरपंत परिचारक याचे नातू तथा आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केला होता. मात्र भाजपाने परिचारक गटाची समजूत काढली असून आता एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवताडे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवेढा भागात असणारे त्यांचे प्राबल्य पाहता त्यांना उमेदवारी दिली आहे हे निश्‍चित.

2009 पासून म्हणजे पुनर्रचनेनंतर पोटनिवडणुकीपर्यंत चार विधानसभा निवडणूक होतील.या चारही लढतीत भालके आहेत. सुरूवातीला तीन वेळा आमदार कै. भारत भालके तर आता पोटनिवडणुकीत भगिरथ भालके उभे आहेत. तर सलग तिसर्‍यावेळी समाधान आवताडे निवडणूक रिंगणात आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!