विठ्ठल मंदिरात अवतरला कैलास पर्वत..अन् सावळे परब्रह्म बनले भोळा सांब

पंढरपूर- गेले काही दिवस पंढरीतील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्रींचे गाभारे सणवार व विशेष दिनी आकर्षक रित्या सजविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज शेवटच्या श्रावणी सोमवारी विठ्ठल व माता रूक्मिणीचे मंदिर श्री महादेवांचे निवासस्थान असणार्‍या कैलास पर्वताच्या प्रतिकृतीत सजविण्यात  आले आहे. श्रींना भोळ्या सांब सदाशिवाचे  रूप देण्यात आले होते. अगदी चंद्रकोर ही येथे लावण्यात आली होती. कापसापासून श्रींचा गाभार व मंदिर शुभ्र हिमालयाप्रमाणे तयार करण्यात आला होता. अशीच सजावट रूक्मिणी मंदिरात होती. आज माता पार्वतीच्या रूपात होती.पंढरीचा विठ्ठल हा हरी आणि हराचे स्वरूप मानला जातो. शैव व वैष्णव या दोन्ही पंथांकडून त्याचे पूजन होते. विठ्ठलाने आपल्या शिरी पिंड धारण केली आहे. तो श्रीहरी असला तरी मस्तकी पिंड असल्याने तो हरीहराचे रूप बनला आहे. वारकरी संप्रदायात काही संतांची उदहारणे  आहेत की जे शिवभक्त होते पण पुढे त्यांना विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर ते या सावळ्या परब्रह्माच्या चरणी लीन झाले. यासाठीच पंढरीनाथाच्या भक्तांमध्ये भेदभाव नाही. चैत्रात शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाचा लग्नाचा उत्सव होतो तेंव्हा पंढरीत एकादशीला ही विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तेथील अनेक कावडी अगोदर पंढरीत येतात व नंतर शिंगणापूरला जातात.श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत प्रिय मानला जातो. येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने या महिन्यात प्रत्येक सोमवारी श्री विठ्ठल व रूक्मिणीचे मंदिर अत्यंत आकर्षक रित्या सजविले आहे. पांढरी फुले, बेल पान यासह गत सोमवारी संकष्टी ही आल्याने दुर्वांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला होता. आज शेवटच्या सोमवारी मंदिराला कैलासाचे रूपय देण्यात आले  आहे. यासाठी कापसाचा वापर करण्यात आला आहे. यात श्रींचे रूप अत्यंत विलोभनीय असे दिसत आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. आज ही हे देवाचे रूप पाहण्यासाठी भाविक येथे येत होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!