श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

पंढरपूर– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील रूग्णांच्या सोयासाठी उपजिल्हा रूग्णालयास हाय फ्लो ऑक्सिजन मशीनची आवश्यकता होती व त्यांनी याची मागणी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे केली होती. समितीने धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेवून तीन मशीन देण्यास मान्यता दिली होती व यापैकी दोन मशीनचे आज हस्तांतरण करण्यात आले.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराने कोरोना काळात मोठी मदत आजवर केली आहे. यापूर्वी उपजिल्हा रूग्णालयात तेथील कर्मचारी व अधिकार्‍यांना पीपीई किटस् आवश्यक सामुग्री दिली होती. याच बरोबर कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गरजूंना अनेक दिवस अन्नदान मोहीम राबविली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रूपये देवू केले होते. विशेष म्हणजे मंदिर गेले पाच महिने बंद असले तरी समितीच्या वतीने अखंड उपाय योजनांमध्ये योगदान दिले जात आहे. यासाठी समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
पंढरपूर व परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर येथे उपचारासाठी येणार्‍यांना आवश्यक असणार्‍या हाय फ्लो ऑक्सिजन मशीनची कमतरता भासत होती. यामुळे उपजिल्हा रूग्णालयाने याची मागणी मंदिरे समितीकडे केली. समितीने याबाबत धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली व प्रत्येकी 2 लाख 82 हजार रूपये किंमतीची तीन मशीन खरेदी केली आहेत. यातील दोन मशीन उपलब्ध झाल्या असून त्या समितीच्या वतीने वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, सुरेश कदम तसेच डॉ. प्रदीप केचे उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!