सांगोला तालुक्यात उजनीचे पाणी आणण्याची तयारी, बहुप्रतीक्षित योजना साकारणार

पंढरपूर – जवळपास एकवीस वर्षे सांगोला तालुका हा उजनीच्या पाण्याची मागणी करत होता. 1995 च्या महायुती सरकारच्या काळात सांगोला उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली मात्र नंतर अनेक घडामोडी घडत गेल्या आणि ही योजना बासनात गुंडाळली गेली. प्रशासकीय मान्यता मिळून ही निधी मंजूर झाला मात्र तो खर्चीही पडला नाही. आता 2021 मध्ये शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बारा गावांसाठी उजनीचे पाणी आणण्याचा चंग बांधला आणि यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी सहकार्य केले आणि अखेर आता या योजनेचा सर्व्हे करण्याचा निर्णय झाला व यासाठी निधी मंजूर होवून याची निविदा ही निघाली आहे.

तालुक्यातील कोणत्याही शेतीच्या पाणी योजनेमध्ये समाविष्ट नसणार्‍या बारा वंचित गावासह लाभक्षेत्रात असणार्‍या परंतु विकेंद्रीत जलसाठे भरण्याची तरतूद नसणार्‍या गावांना उजनीचे दोन टीएमसी पाणी मिळण्याच्या कामाला सुरुवात झाली असून याच्या सर्व्हेक्षणासाठीची पावणे दोन कोटी रुपयांच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.

तालुक्यातील बागलवाडी, सोनलवाडी, नवीन व जुनी लोटेवाडी, अचकदानी, अजनाळे, खवासपूर, कटफळ, इटकी, यलमार मंगेवाडी, लक्ष्मीनगर, चिकमहूद, जाधव वाडी व तळेवाडीसह बारा वंचित गावांचा यात समावेश आहे. सांगोला उपसा सिंचन योजनेला 1998 सली तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांनी मंजुरी दिली होती व 2000 मध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेच्या 74 कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. ती खर्ची न पडल्याने मंजुरी रद्द झाली होती. 22 गावे नीरा उजवा कालव्यात समाविष्ट केल्याने ही गावे लाभक्षेत्रात आली आहेत. परंतु वरील बारा गावे कोणत्याच लाभक्षेत्रात समाविष्ट नसल्याने उजनीचे दोन टीएमसी पाणी या वंचित गावांना मिळणार आहे.

या बारा गावांचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे होते. यासाठी आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांनी याबाबत जलसंपदा विभागाला आदेश दिला होता. त्यानुसार पावणेदोन कोटींच्या निविदेची प्रसिद्धी झाली आहे.

ड्रोनसारख्या अद्ययावत यंत्रणेमार्फत अचूक सर्व्हेक्षण कमी वेळात होणार आहे. या योजनेसाठी 500 ते 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून कोणते गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही हे निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करणारच अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!