सोलापूर विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
सोलापूर, दि.8- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलामध्ये ग्रामीण विकास या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर ग्रामीण विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. एक वेगळे व हटके करिअर ग्रामीण विकास क्षेत्रात करण्याची संधी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. संशोधनाबरोबरच शासकीय-निमशासकीय क्षेत्रामध्ये नोकरीची संधी यामुळे प्राप्त होऊ शकते.
केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड या क्षेत्रातही विशेष कार्य करण्याची संधी ग्रामीण विकास अभ्यासक्रम केल्यानंतर प्राप्त होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, विमाक्षेत्र, स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर अशासकीय संघटना यामध्ये देखील एक वेगळे करिअर करता येते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ग्रामीण विकास अभ्यासक्रमासाठी सध्या ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. चेतन मोरे (9970774488) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.