महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय घडणार? सत्तासंघर्ष शिगेला
प्रशांत आराध्ये
भाजपाच्या विस्ताराची अन्य पक्षांना भीती
महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची साथ घेत मागील तीस वर्षात जे आपले बस्तान बसविले आहे. हे पाहता अन्य राजकीय पक्षांची भाजपाचा हा वारू रोखण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दिसत आहे. मागील 2014 च्या निवडणुकीत 288 जागा लढलेल्या भाजपाला 122 जागा जिंकता आल्या होत्या तर यंदा महायुतीत 164 जागा घेवून 105 पर्यंत त्यांनी मजल मारली. सलग दोन निवडणुकांमध्ये शंभरी पार केलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हाच एकमेव अजेंडा काही राजकीय पक्षांचा दिसत असल्याने आता राज्यात कोणाचे सरकार बनणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.वास्तविक पाहता शिवसेना व भाजपा यांनी एकत्र निवडणूक लढविली असली तरी निकाला दिवशी पासूनच मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात निर्माण झालेली कटूता पाहता गेले पाच वर्षे एकत्र सत्ता त्यांनी कशी चालविली हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. युतीला जनादेश असून ही ना भाजपा सरकार बनविण्याच्या स्थितीत नाही हे आकडेवारी वरून स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेने पहिल्या दिवशीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सातत्याने ठेवलेला संपर्क बरेच काही सांगून जात आहे. मात्र यातून नव्या सत्तेची समीकरण तयार होणार का? हे येत्या काही तासात समजून येईल. दोन्ही काँग्रेसनी सुरूवातीपासून आम्ही विरोधात बसण्यास तयार असल्याचे सांगितले असले तरी भाजपा व शिवसेनेत निर्माण झालेल्या गतिरोधात त्यांना सत्तास्थापनेची संधी दिसत आहे. यामुळेच तर शरद पवार यांचे मुंबईतील सिल्वर ओक हे निवासस्थान येथील केंद्रबिंदू बनले आहे.भारतीय जनता पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात होत चालला आहे, दोन्ही काँग्रेसच्या जेवढ्या जागा मिळाल्या आहेत. त्यापेक्षा जास्त एकट्या भाजपाच्या आहेत तर शिवसेनेपेक्षा त्या दुप्पट आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा हा यशाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस व शिवसेना नवीन सत्तेचे समीकरण तयार व्हावे अशी तयारी करत असल्याचे दिसत आहे.
शरद पवार यांच्याभोवती फिरतंय राजकारण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडी घेत सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आव्हानं स्वीकारले व आपल्या अनुभवाच्या जोरावर भाजपाला अनेक ठिकाणी रोखले. काँग्रेसला ही त्यांचा फायदा झाला व शंभरच्या आसपास जागा आघाडीने जिंकल्या. निकालानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सतत पवार यांच्या संपर्कात उघडपणे आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जी काँग्रेसस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हती..त्यांचे राज्यस्तरीय नेते ही आता पवार यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवार यांचा संपर्क आहे. असे असले तरी शरद पवार हे सतत भाजपा व शिवसेनेने एकत्रित सरकार स्थापन करावे असा वडिलधारा सल्ला ही देताना दिसत आहेत. पवार यांचे राजकारण कोणाला ही समजणे शक्य नाही. आता ही त्यांच्या मनात काय आहे हे समजण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यांचे केंद्रीय पातळीवर सर्वच राजकीय पक्षात संबंध आहेत. गेले पंधरा दिवस पवार यांच्याच भोवती येथील राजकारण फिरत आहे.
भाजपा आतून आक्रमक पण वरून शांत
देशाच्या व राज्याच्या राजकारणात सत्ताधारी असणार्या भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर हा पक्ष केवळ शिवसेनेवर अवलंबून राहून पुढील दिशा ठरवेल असे मानणे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानावे लागणार आहे. ते महायुतीचे सरकार येणार असे ठासून सांगत आहेत. त्यांनी शिवसेनेबरोबर चर्चेची दारं उघडी असल्याचा दावा केला आहे. मात्र चर्चा होत नसेल तर पडद्याआड काही ना काही चालूच असणार हे निश्चित. अनेक राज्यात सरकार बहुमत नसताना ही स्थापनेचा त्यांना अनुभव आहे. फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्व मदत करत नसल्याचा अनेकांचा दावा आहे मात्र अशा वेळी केल्या जाणार्या खेळ्या या उघडपणे नसतात. त्या गुप्तच असतात. भाजपाचे केंद्रीय नेते महाराष्ट्रासारखे राज्य जे दक्षिण राज्यांचे प्रवेशद्वार ते हातून जात असताना स्वस्थ बसतील , असे होणे शक्य नाही. सध्या त्यांची भूमिका वरून शांत आणि आतून आक्रमक अशीच आहे.
काँग्रेसला शिवसेनेला पाठिंबा देवून फायदा काय?
राज्यात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला भाजपा पाठोपाठ 100 जागा मिळाल्या आहेत. त्यांची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने जर भाजपा सरकार स्थापन करू शकला नाही तर आघाडी यासाठी दावा करू शकते. शिवसेना व भाजपातील वितुष्ट वाढत जाणे हे आघाडीच्या पथ्थ्यावरच पडणार आहे. मात्र सध्या शिवसेना आपला मुख्यमंत्री करू पाहत असून यासाठी त्यांना दोन्ही काँग्रेसच्या मदतीची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष हा शिवसेनेबरोबर सत्तेत ही जावू शकतो मात्र काँग्रेसस ही अनेक राज्यात सत्तेवर असून येणार्या काही राज्यांच्या निवडणुकांना त्यांना सामोरे जायचे आहे. यात त्यांना धर्मनिरपेक्ष चेहरा कायम ठेवावा लागणार आहे व अशा वेळी शिवसेनेबरोबर सत्तेत जाणे अथवा पाठिंबा देणे त्यांना कितपत परवडणार यावरच दिल्लीत चर्चा सुरू आहेत. केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अन्य पक्षांना पाठिंबा देणे कितपत राजकीयदृष्ट्या परवडणार नाही हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओळखून आहेत.