कृष्णा-भीमा स्थिरीकरणाशिवाय मोहितेंनी काहीच मागितले नाही : मुख्यमंत्री

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणार्‍या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून उमेदवारी मागितलीच नव्हती. त्यांनी केवळ या भागातील शेतकर्‍यांच्या सोयीसाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प राबविण्याचा आमच्याकडे आग्रह केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. यामुळे आता मोहिते पाटील यांच्या उमेदवारीबाबत जी चर्चा सुरू होती या पूर्णविराम मिळाला आहे. माढा मतदारसंघात रणजितसिंह अथवा खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे उमेदवार असतील असा अंदाज त्यांच्या पक्षप्रवेशानंतर बांधला जात होता. भाजपाने रणजिसिंह नाईक निंबाळकर यांना काँगे्रसमधून पक्षात घेत तिकिट दिले. यानंतर हा विषय सतत चर्चेत येत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मोहिते पाटील ही एक फोर्स असून याचा उपयोग नक्कीच मोठ्या प्रमाणात होणार आहे. माढ्याची जागा भाजपा शंभर टक्के जिंकणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली नव्हती. हा विषयच झालाच नाही. त्यांनी शेतकर्‍यांच्या सोयीची ठरणार्‍या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प आपणा राबवावी अशी मागणी माझ्याकडे केली आहे. राष्ट्रवादीत असताना ही योजना व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले मात्र तेथे यश आले नाही. ते या योजनेच्या पूर्णत्वासाठी भाजपात आले आहेत. मोहिते पाटील यांची ताकद मोठी आहे , याचा उपयोग नक्कीच आगामी काळात पक्षाला होईल. ते पक्षात यावेत म्हणून कोणताही दबाव आम्ही टाकलेला नाही. त्यांच्या विषयी कोणतीही चौकशी सुरू नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. मोहिते पाटील यांनी आपल्या कारखान्याला ही मदत सरकारकडे मागितली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या उलट राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे बंधू आमदार बबनराव शिंदे यांच्या साखर कारखान्याला आपण मदत केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. माढा लोकसभेची जागा भाजपा जिंकणार असून नाईक निंबाळकर यांच्यामुळे सातारा भागातील मतदान भाजपाला जास्त होईल तसेच मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात जी महाआघाडी संजय शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर तयार केली आहे यातील शिंदे हेच केवळ राष्ट्रवादीत जावून लोकसभेचे उमेदवार झाले आहेत बाकी सर्व नेते हे आमच्या सोबत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना गोव्याचे राज्यपाल केले जाणार काय ? यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना इतक्या लवकर राजकारणातून निवृत्त करता काय ? असा प्रतिसवाल केला. गोव्यात सध्या राज्यपाल आहेत व त्यांचा कार्यकाळ ही शिल्लक आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे ताकदीचे नेते असून त्यांना इतक्या लवकर निवृत्त होवू दिले जाणार नाही. असे सांगत फडणवीस यांनी आगामी काळात विजयदादांना मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत यावेळी दिले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!