कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पंढरीचे अर्थकारण वाहून जातयं ! , यंदाही वारी रद्द दुकानदारांची अवस्था बिकट

राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी www.vedhak.com ला जरुर भेट द्या.

पंढरपूर- कोरोनाचा कहर सुरू होवून पंधरा महिन्याहून अधिकचा काळ लोटला असून यात संसर्ग रोखण्यासाठी बहुतांश वेळा पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर बंदच ठेवावे लागले आहे. यामुळे भाविकांवर चालणार्‍या या शहराचे अर्थकारण पारच बिघडले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तोटा सहन करून तग धरून राहिलेला येथील व्यापार आता दुसर्‍या लाटेत पुरता वाहून जातो की काय? काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाची आषाढी वारी भरणार नाही हे निश्‍चित झाले आहे. पायी पालखी सोहळ्यांना परवानगी नाही. बसेसमधून मानाच्या दहा पालख्या पंढरीत येतील व अवघ्या 36 तासात त्या परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. या आषाढीतही भाविक पंढरीत येवू शकणार नाहीत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात याचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. आजही पंढरपूर व अन्य तालुक्यांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. जरी प्रशासनाने काही अटी शिथिल करून व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पंढरपूरमधील मंदिर परिसरात सध्याही नीरव शांतता असते. मंदिर बंद असल्याने भाविकांविना रस्ते ओस आहेत. व्यापारी दुकानं उघडतात पण ग्राहकांची त्यांना प्रतीक्षा आहे.
शहरात अन्य दुकानांना स्थानिक ग्राहकांवर अवलंबून राहावे लागत आहे. यापूर्वी भाविकांच रेलचेल असल्याने हॉटेल, लॉज, धर्मशाळा यासह अन्य दुकाने चालत होती. मात्र भाविकांविना येथील व्यवसाय मंदावला आहे. याचा सर्वाधिक फटका मंदिर परिसरातील लहान मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. प्रासादिक वस्तू, पूजेची साहित्य, ग्रंथ, वाद्य, पितळी मूर्ती यासह तुळशी माळा, फोटा, फुले यांना मागणीच नाही. कोरोनाची ही परिस्थिती आणखी किती काळ चालणार?याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.

विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर अवलंबून असणार्‍या व्यावसायिकांची केविलवाणी स्थिती झाली आहे. पंधरा महिन्यांपैकी काहीच काळ त्यांना दुकान उघडता आली आहेत. आता सलग दुसर्‍या वर्षी कोरोनाचा कहर सुरूच राहिल्याने त्यांच्या समोर आता आर्थिक आव्हानं उभी राहिली आहे. मंदिर परिसरात जागांना मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते मात्र आता व्यवसायच नसल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. पंढरपूर हे यात्रा व महिन्याच्या दोन एकादशींवर चालणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र पंधरा महिन्यात ही ओळख आता पुसली गेली आहे.

पंढरपूरमध्ये आता अनेकांनी घरगुती खाद्य पदार्थ तयार करून पार्सल देणे, अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ असणारा भाजीपाला विक्री अशी कामे सुरू केली आहेत. अनेक महिने मोठी दुकान बंद असल्याने कामगार ही बेकार होते. आता ही दुकाने सुरू झाल्याने काही प्रमाणात काम परत मिळू लागली आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने थकलेले बँक हप्ते, वीज बिले, दुकानांचे भाडे, नगरपरिषदेचे कर भरता भरता लहान व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. यासाठीच पंढरीतील अनेक संघटनांनी नगरपरिषदेने कर माफ करण्याची मागणी केली आहे. यात्रा भरत नसल्याने शासनाकडे येणार्‍या पाच कोटी यात्रा अनुदातून करमाफीचा दिलासा देण्याचा आग्रह होत आहे. याबाबत शासन दरबारी म्हणजे नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी होत आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!