कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर पॅटर्न सोलापूर जिल्ह्यात राबविण्याची सूचना

पंढरपूर.दि.19: कोरोना विषाणू प्रसाराला अटकाव करण्यात पंढरपूर येथील अधिकार्‍यांनी विविध उपाययोजना करुन उल्लेखनीय यश मिळविले आहे. या पंढरपूर पॅटर्नची जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते.
भरणे म्हणाले, पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेले योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी,नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य समन्वय यामुळे ‘पंढरपूर पॅटर्न तयार झाला आहे. यामुळेच पंढरपूर तालुक्याने कोरोना विषाणूच्या प्रसारावर मात केली आहे. यासाठी शासनस्तरावर अजून काही आवश्यक ती मदत लागली तर उपलब्ध करुन देण्यात येईल. आरोग्य विभागाने अधिकारी, कर्मचारी यांची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेवून तत्काळ कार्यवाही करुन कंत्राटी पध्दतीने भरती करावी. तसेच कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधन तत्काळ द्यावे. जिल्ह्यात कोरोना बाबत करण्यात येणार्‍या उपायोजनांबाबत निर्माण होणार्‍या समस्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात तसेच जिल्ह्यात नवीन रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता संबधितांनी घ्यावी.
शासनाकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या नावावर जमा करावे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीचे वाटप व विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्या. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार शाळा सुरु करण्याबाबत योग्य नियोजन करा अशा अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
यावेळी आमदार भारत भालके यांनी कोविड रुग्णालयाबात योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करत शाळा सुरु होण्यापूर्वी शहरी व ग्रामीण भागातील शाळा तपासून निर्जंतुकीकरण करून घेण्याचे आवाहन केले. आमदार दत्तात्रय सावंत यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत नियोजन करावे असे सांगितल.े यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे जे नुकसान झाले आहे, याची भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी केली.
यावेळी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली .

वारकर्‍यांनी पंढरपूरला येऊ नये
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. परंपरा अबाधित राखत मानाच्या पालख्यांना येथे येण्यास परवानगी देण्यात आली आहे. या खेरीज अन्य भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येवू नये असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!