आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा: कुलगुरू

‘कोविड 19 व ग्रामीण विकास’ राष्ट्रीय वेबिनारमध्ये 804 जणांचा सहभाग

सोलापूर, दि.19– केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधण्याची संधी असून यासाठी ग्राम विकासासाठी योगदान देणाऱ्या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज शेती, सेवा आणि उद्योग क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. ग्रामीण भाग आणि शेती क्षेत्रासाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत, त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्यावतीने ‘कोविड-19 आणि ग्रामीण विकास’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस या बोलत होत्या. यामध्ये हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. शिवा प्रसाद आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था तेलंगणाचे प्रोफेसर राजेंद्र मामगेन यांचेही मार्गदर्शन झाले. प्रारंभिक सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी प्रास्ताविक करून या राष्ट्रीय वेबिनार संदर्भात माहिती दिली. या वेबिनारसाठी एकूण 804 जणांनी नोंदणी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून देशाचा विकास हा ग्रामीण भागावर अवलंबून आहे. आज कोरोना या जागतिक महामारीमुळे देशापुढे मोठे संकट उभे आहे. संपूर्ण जगाला याचा फटका बसलेला आहे. या महामारीतून पुढे जाण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र शासनाने योजना आखली आहे. त्या योजनेचा फायदा घेत कृषी, सेवा, उद्योग क्षेत्राचा विकास करण्यासाठी व आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.

डॉ. शिवा प्रसाद यांनी मजुरांचे स्थलांतर या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, येत्या काळात ग्रामीण भागात रोजगार वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वास्तविक ग्रामीण भागात रोजगाराची संधी आहे, मात्र त्यासाठी शासन, उद्योजक, शेतकरी या सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

डॉ. मामगेन म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवरून ग्रामविकासासाठी जाहीर होणाऱ्या योजनांकरिता ग्रामपातळीवर स्वतंत्र यंत्रणा असावी. त्याचबरोबर याकरिता वेगळे अंदाजपत्रक देखील असणे जरूरीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सामाजिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांचा विकास साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये एकूण 804 जणांनी सहभाग घेतला तर एकूण 98 प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची उत्तरे मान्यवरांनी दिली. आभार प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी मानले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!