दादांनी देवेंद्रभाऊंना ‘ मामा ‘ बनविल्याची चर्चा

प्रशांत आराध्ये

पंढरपूर-  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपाला आपला पाठिंबा देवू केला..75 तास तो कायम ठेवला आणि नंतर वैयक्तिक कारणास्तव स्वतः उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देवून सरकारमधून बाहेर पडले. अजितदादांच्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस तीन दिवस मुख्यमंत्री बनले खरे अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे त्यांना ही पायउतार व्हावे लागले आहे. जर दादांना परत जायचे होते तर ते भाजपाबरोबर आलेच का हा प्रश्‍न आता सार्‍यांना पडला आहे. अजितदादांनी देवेंद्रभाऊंना ‘मामा’ तर बनविले नाही ना? अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे.अजित पवार यांनी भाजपाबरोबर सरकार बनविल्यानंतर त्यांचे काका व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केला. ऐंशीव्या वर्षी ही सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्या व बहुतांश आमदारांना आपल्या बाजूला पुन्हा वळविले. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेेते त्यांच्याकडे धाडले. अजितदादा कुणालाच जुमानले नाहीत. त्यांनी तर काल ट्विटरवरून अनेक संदेश पाठविण्याचा सपाटा लावला होता. यामुळे अजित पवार व भाजपाचे निर्माण झालेले सरकार तरणार असे निश्‍चित मानले जात होते. मात्र मंगळवारी सर्वोच्य न्यायालयात दोन्ही काँगस व शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल लागला व बुधवारीच बहुमत सिध्द करण्यास सांगण्यात आले. अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर जेंव्हा भाजपाला पाठिंबा दिला होता तेंव्हा ते राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाचे नेते होते. याच जोरावर त्यांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. मात्र  पुढील दोन दिवसात राष्ट्रवादीमध्ये ही खूप घडामोडी घडल्या.अजित पवार यांच्या भूमिकेमुळे पवार कुटूंबात ही फूट पडल्याचे दिसत होते. या काळात शरद पवार यांनी कणखर भूमिका घेत महाविकास आघाडीची सत्ता आणायचीच असा चंग बांधला. यात त्यांची सरशी झाली.अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी वैयक्तिक कारणास्तव अवघ्या 75 तासातच आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि भाजपा तोंडावर पडली. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय पर्यायच उरला नाही. कारण त्यांनी अजित पवार यांच्या जीवावर हे सरकार स्थापन केले होते. यातच दोन्ही काँग्रेस व शिवसेनेने आपले आमदार ही एकत्र ठेवले होते.अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतली होती ती कदाचित भावनेच्या भरात असावी असे वाटते. यापूर्वी ही अजितदादांनी विधानसभेपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा असाच अचानक दिला होता. त्यावेळी राज्यात चर्चेचा ऊत आला होता. आता ही तशीच स्थिती आहे.  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली खरी पण त्यांनी पदभार घेतला नव्हता. तर मंगळवारी राजीनामा दिल्याने औट घटकेचे फडणवीस सरकार ही पडले असेच म्हणावे लागेल. पण प्रश्‍न उपस्थित होतो की अजितदादांना जर राजीनामाच द्यायचा होता तर  देवेंद्रभाऊंना सरकार स्थापन करायला कशासाठी लावले. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला म्हणून सांगितले जात असले तरी यामुळे भाजपाला केवळ तीन दिवसात सत्ता सोडावी लागली आहे. एका मोठ्या राष्ट्रीय व केंद्रातील सत्ताधारी असणार्‍या पक्षाने याबाबत चिंतन करण्याची ही वेळ आहे. केवळ विरोधकांना रोखण्यासाठी अशा खेळलेल्या खेळ्या अंगलट येवू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागणार आहे.

7 thoughts on “दादांनी देवेंद्रभाऊंना ‘ मामा ‘ बनविल्याची चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!