दूध दरवाढीच्या मागणीसाठी सरकारच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

पंढरपूर – गाईच्या दुधाला प्रति लीटर तीस तर म्हशीच्या दुधाला साठ रूपये दर मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून रास्ता रोको आंदोलन तालुक्यातील एकलासपूर येथे करण्यात आले.

गुरूवारी सकाळी नऊ वाजता रयत क्रांती संघटना व दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने पंढरपूर ते मंगळवेढा रस्त्यावरील एकलासपूर येथे रास्ता रोको करण्यात आला. आज संपूर्ण महाराष्ट्रभर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून व आसूड ओढून आंदोलन केले जात आहे.

गाईच्या दुधाला प्रति लीटर तीस रूपये व म्हशीच्या दुधाला साठ रूपये दर मिळावा अशी संघटनेची मागणी आहे. सध्या शेतकरी अडचणीत असताना दुधाचे दर कमी केले गेले आहेत. याचा निषेध या आंदोलना दरम्यान नाेंंदविण्यात आला. येत्या आठ दिवसात दुधाचे दर जर वाढले नाहीत तर रयत क्रांती संघटनेच्यावतीने मुंबई व पुण्याला जाणारे दुधाचे टँकर अडविण्याचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे. यावेळी बबलू ताड, पांडुरंग शिंदे, अनिल गायकवाड, दाजी ताड, सचिन पाटील, दादा घाटूळ, शंकर गवळी, सावकार शिंदे, महावीर गायकवाड, सुनील शिंदे व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!