पूर्वी शेतकऱ्यांना ऊसदराची असायची उत्सुकता..आता कारखान्याला थकहमी अन्‌ धुराडे पेटण्याची चिंता

पंढरपूर – मागील काही वर्षापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोंबर महिना आला की साखर कारखान्यांचा नवा गळीत हंगाम सुरू होण्याची लगबग सुरू व्हायची..आणि याचवेळी ऊस उत्पादकांना उत्सुकता असायची ती ऊसदर जाहीर होण्याची. चढाओढीने कारखाने दर द्यायचे.. जर यास उशिर झाला तर शेतकरी संघटनांची आंदोलन सुरू व्हायची..मात्र आता मागील दोन दोन हंगामातील थकीत ऊसबिलाच्या रकमा मागण्याची वेळ शेतकरी आणि संघटनांवर आली आहे. यंदा तरी कारखाना सुरू होणार नाही की याची चिंता सभासदांना भेडसावते. कारखान्यांना शासनाकडून थकहमी मिळते की नाही याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असते.
साखर कारखानदारी हा पश्‍चिम महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्या सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा मोठा उद्योग. सर्वाधिक कारखाने असणारा हा जिल्हा देशात प्रसिध्द आहे. अगोदर सहकारी साखर कारखानदारी येथे बहरली व नंतर आता खासगी कारखान्यांची सर्वाधिक संख्या येथेच झाली आहे. एकेकाळी खासगी कारखाने येथे सहकारी करण्यात आले मात्र आता याच भागात खासगी साखर कारखानदारीचे पेव फुटले आहे. साखरेचे दर कोसळल्याने मध्यंतरी कारखान्यांसमोर संकट निर्माण झाले होते. यातून काही कारखाने सावरले तर काहींची अवस्था बिकट झाली.
सध्या 2020-21 चा नवा गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ नजीक येवून ठेपली आहे. अनेक कारखान्यांनी आपले बॉयरल अग्निप्रदीपन केले आहे परंतु उसाचा कॅलिफोर्निया असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कारखान्यांनी मागील ऊसदराचे पैसे यासह कामगारांचे पगार व ऊसतोडणी वाहतूकदारांचे पैसे द्यावेत म्हणून आंदोलन सुरू आहेत. मागील हंगामात तालुक्यातील कारखाने सुरूच झाले नव्हते. एक बाजूला शेजारी असणारा श्रीपूरचा पांडुरंग सहकारी असो की माढा तालुक्यातील विठ्ठल शिंदे सहकारी साखर कारखाना ..ते चांगला दर देवून पंढरपूरच्या उसावरच कारखाने नेटाने चालवित असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील स्थानिक कारखाने मात्र बंद होते. याच कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे थकले म्हणून दोन वर्षे झाली आंदोलनच होत आहेत. सध्या ही या कारखान्यांकडून पैसे मिळावेत म्हणून स्वाभिमानी असो की जनहित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरत आहेत.
आता नवीन हंगाम सुरू होत असताना मागील वर्षी बंदच राहिलेल्या कारखान्यांना शासनाची थकहमी मिळणार आहे व ते यंदा आपला गळीत हंगाम सुरू करणार असे सांगितले जात आहे. कारखान्यात मिल रोलरचे पूजन काहींनी केले आहे. काही वर्षांपूर्वी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ऊसदर कोण देणार याची स्पर्धा असायची. ते दिवस पुन्हा येतील का? हा प्रश्‍न आहे. सध्या तर गतहंगामात बंद कारखाने सुरू करण्याचीच चर्चा आहे. साखर कारखान्यांना शासन थकहमी देते ही तर प्रशासकीय बाब मानली जाते मात्र आता याची जाहीर चर्चा होत आहे. शासनाची थकहमी, कारखान्याला कोणती बँक कर्ज देणार.. संस्थांवर कर्ज किती यासारखे विषय पारावरच्या गप्पात आता रंगवून ..रंगवून चर्चिले जात आहेत.
साखर कारखानदारीने पंढरपूर तालुक्यासह आजुबाजूचा कायापालट केला आहे. दुष्काळी पट्ट्ा मानल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात देखील साखर कारखानदारी जोमाने फोफावली आहे. दामाजी सहकारी साखर कारखान्याचा नुकताच बॉयलर अग्निप्रदीपन झाला आहे. युटोपियन असो की तेथील अन्य साखर कारखाने गतहंगामात सुरू राहिले होते व यंदाही त्यांची गळीत हंगामाची तयारी सुरू आहे.
साखर कारखानदारीसमोर संकट अनेक आहेत. मात्र यातून ही अनेक कारखाने मार्ग काढून हा उद्योग नेटाने करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर जिल्ह्यात अनेक साखर कारखाने असेही आहेत ज्यांची धुराडी पेटणार की नाही? याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. कारखान्यांकडून किमान जाहीर करण्यात आलेल्या एफआरपी इतका तरी दर वेळेत मिळावा अशी उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा असते मात्र अनेक कारखान्यांकडून यास ही विलंब होत आहे. दोन दोन वर्षे पैसे थकीत राहत आहेत. मागील हंगामात काही कारखाने बंदच राहिल्याने कामगारांचे वेतन थकले आहेत. यावर तोडगा काढला गेला पाहिजे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!