निष्ठेचे फळ :राज ठाकरेंनी दिले दिलीपबापूंना बळ, मनसे नेतेपदी नियुक्ती

पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे च्या सर्वोच्च अशा मनसे नेतेपदी निवड केली असून मुंबई येथील कृष्णकुंज निवस्थानी त्यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. धोत्रे हे मागील 29 वर्षांपासून ठाकरे यांच्यासमवेतच काम करत असल्याने त्यांना निष्ठेचे फळ मिळाल्याचे दिसत आहे.

1992 पासून दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे यांच्यासमवेत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम सुरू केले ते आजतागायत त्यांच्या समवेतच आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर त्यांच्यावर मागील काही वर्षात विविध जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. आता त्यांना मनसेचे नेते असा मान दिला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी कोरोना काळात हजारो कुटुंबाना मदत केली आहे.राज ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडेन, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एकनिष्ठतेचे हे फळ आहे, अशी प्रतिक्रिया धोत्रे यांनी निवडीनंतर दिली.

अलिकडच्या काळात एकाच पक्षात व एकाच नेत्याबरोबर काम करण्याची पध्दत कमी होत असून प्रत्येकजण वैयक्तिक फायद्यासाठी पक्षांतर सतत करताना दिसतात व यातून स्वविकास साधतात. मात्र धोत्रे यांनी राज ठाकरे यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयात त्यांची साथ दिली आहे. 29 वर्षे ते त्यांच्याबरोबर काम करत आहेत. यामुळेच त्यांना शॅडो सहकारमंत्री, सहकार विभागाचे राज्याचे प्रमुखपद मिळाले तसेच ठाकरे यांनी धोत्रे यांचा वाढदिवसही आपल्या घरी साजरा करून त्यांना सुखद धक्का दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यात क्रेझ आहे. मुंबई, पुणे, नाशिक पट्ट्यात शहरी भागात तसेच सोलापूर, औरंगाबादसह इतर जिल्ह्यातही आगामी काळात हा पक्ष चांगले यश मिळविले असे चित्र आहे. दिलीप धोत्रे यांना मनसे नेतेपदाची संधी मिळाल्याने त्यांना ही जिल्ह्यात आता आपली ताकद वाढविण्यास मदत होणार आहे. मनसेने आता नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपली ताकद आजमावली पाहिजे. कारण विधानसभेची तयारी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्वावरून मतदारांचा कौल लक्षात येतो. दिलीप धोत्रे हे पंढरपूर व जिल्ह्याच्या राजकारणात रूळलेले आहेत त्यांनी आता आपली ताकद दाखविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले पाहिजे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!