विधानपरिषद निवडणूकः  फडणवीस  व पाटील यांना हादरा, वर्षपूर्ती काळात महाविकास आघाडीत उत्साह

प्रशांत आराध्ये
पंढरपूरः नागपूर व पुणे हे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे गड भारतीय जनता पक्षाने गमावले असून हा या पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा हादरा मानला जात आहे. तर शांतपणे व्यूहरचना आखणार्‍या महाविकास आघाडीत मात्र यामुळे आनंदाचे वातावरण आहे. या निकालांनी एक्झिट पोलची भविष्यवाणी चुकीची ठरविली आहे. दरम्यान पदवीधरांच्या या मतदारसंघात भाजपाला नाकारले जाणे हे या पक्षासाठी आत्मचिंतनाचा विषय बनला आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा पाच दशकांहून अधिक काळ भाजपाचा गड मानला जातो. सध्याचे देशातील सर्वात कर्तबगार केंद्रीयमंत्री असणार्‍या नितीन गडकरी यांनी याचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर भाजपाचे राज्याचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांचा हा घरचा मतदारसंघ आहे. त्यांनीच येथून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र यंदा येथेच भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. काँग्रेसचे अ‍ॅड.अभिजित वंजारी हे येथे आघाडीवर होते तर पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अरूण लाड यांनी जिंकला आहे. भाजपाने येथे जवळपास तीस वर्षे आपले वर्चस्व ठेवले होते. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच येथून 2014 ला विजयी झाले होते. त्यांनी बारा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यापूर्वी भाजपाचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर येथून विजयी होत. मात्र आता मतदारसंघही भाजपाने गमावला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने जोरदार फिल्डींग लावत पुणे पदवीधर मतदारसंघ काबीज केला आहे. प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची होती. यात त्यांनी यश मिळविले आहे.
पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघ आपणच जिंकणार असा दावा भाजपाच्या नेत्यांचा होता. मात्र अतिआत्मविश्‍वास येथे नडल्याचे दिसत आहे. नागपूरमध्ये काँग्रेसने तर पुण्यात राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांना मिळालेले हे यश कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे आहे. मुळात पदवीधर मतदार हा भाजपाला पसंती देतो असे मानले जात होते मात्र या विधानपरिषद निकालाने हा दावा फोल ठरला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी सलग तिसर्‍यांदा यश मिळविले आहे. राष्ट्रवादीच्या चव्हाण यांचा हा हॅट्रिक विजय आहे. मराठवाड्यातील औरंगाबादची जागा जिंकण्यासाठी भाजपाच्या बड्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा या भागात प्रभाव आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. पुणे शिक्षण मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. तर अमरावतीमध्ये शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे पिछाडीवर होते तर येथे अपक्ष किरण सरनाईक विजयाकडे आगेकूच करत आहेत.
भाजपाला केवळ धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा जिंकता आली असून काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या अमरीश पटेल यांनी मोठ्या फरकाने स्वबळावर ही जागा जिंकली आहे. दरम्यान पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपाला पत्करावा लागलेला पराभव हा मोठा आहे. देशात अन्य राज्यात भाजपाची हवा असताना महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदारांनीच भाजपाला नाकारल्याचे चित्र आहे. यातून आता हा पक्ष काय बोध घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत श्री.अरुण लाड विजयी
पुणे, दि. 04– पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.
श्री. अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैंकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!