शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतानाच परंपरा कायम राहतील याअनुषंगाने आषाढीत सर्व विभागांनी काम करावे : जिल्हाधिकारी

पंढरपूर, : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतानाच परंपरा कायम राहील याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. गोपाळपूर येथील स्वेरी संस्थेच्या सभागृहात ही बैठक झाली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला श्री. ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.
श्री. शंभरकर यांनी शासनाने आषाढी वारीबाबत अतिशय स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी नेमून दिलेल्या जबाबदारीची अंमलबजावणी करावी. विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभाग, पंढरपूर नगर परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग यांच्या विभागप्रमुखांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे. आषाढीवारी सोहळा नेटकेपणाने आणि कोरोना विषयक नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गुंड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून
वाखरी पालखी तळ, विसावा मंदिराची पाहणी पंढरपूर, :-आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज वाखरी येथील पालखी तळ , विसावा मंदीर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच मंदिराची पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
वाखरी पालखी तळाला बॅरेकेटींग करणे, पालखी तळाची स्वच्छता राखणे, अखंडीत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी. पालखी तळावर तात्पुरती विसावा व्यवस्था व मंडप टाकावा. तात्पुरते स्वच्छतागृह उभारावीत, पोलीस प्रशासनाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करावे तसेच पालखी तळावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत प्रशासनाने वाखरी पालखी तळ स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीपात्र स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्याची डागडुजी करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पालखीतळावर करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. प्रांताधिकारी ढोले यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. मंदिर समितीच्या वतीने पालख्यांचे स्वागत व शासकीय महापूजेबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, सरपंच कविता पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गुंड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!