आ.प्रशांत परिचारक यांच्या दोन वेगवेगळ्या कोरोना अहवालांवरून विधानपरिषदेत चर्चा ; अशा रिपोर्टची आरोग्य व गृहविभागाने चौकशी करण्याचे उपसभापतींचे निर्देश

निगेटिव्ह व्यक्तीचा अहवाल एक दोन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह येणे शक्य आहे मात्र पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर तो एक दोन दिवसात निगेटिव्ह कसा येवू शकतो..याबाबत आरोग्य व गृहविभागाने चौकशी करावी. असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचणी अहवालावर मंगळवारी सभागृहात विस्तृत चर्चा झाली.

मुंबई- विधानपरिषदेत मंगळवारी एका दिवसात कोरोनाच्या बदलणाऱ्या चाचणी अहवालावर चर्चा झाली. निमित्त होते आमदार प्रशांत परिचारक यांच्या रिपोर्टचे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करत भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांचा 28 फेब्रुवारी रोजीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले तर 1 मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह होता यावर प्रश्‍न उपस्थित केला.
आ.शिंदे म्हणाले, अधिवेशनकाळात आपण सर्व अधिकारी ,कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. अशावेळी या सभागृहातील एका आमदारांचा अहवाल 28 फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह येतो आणि नंतर 1 मार्च त्यांचाच अहवाल निगेटिव्ह असतो. हे कसे.. आपण हा प्रश्‍न येथे व्यक्तीद्वेष अथवा विभिन्न पक्षाचे असल्याने उपस्थित केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका दिवसात कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होत असेल तर याची चौकशी होणे गरजेचे आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची अधिवेशनाला जाण्यापूर्वी पंढरपूरला चाचणी करण्यात आली होती आणि तो अहवाल पॉझिटिव्ह होता आणि नंतर पुण्यात केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. यासाठी दोन्ही ठिकाणची चौकशी करणे गरजेचे आहे.
दरम्यान या मुद्द्याला गांभिर्याने घेत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत चर्चा सुरू केली. यावर बोलताना भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, आपण अधिवेशनासाठी येत असताना पुण्यात एका खासगी लॅबमध्ये चाचणी केली व मुंबर्इत पोहोचलो. रात्रौ अकरा वाजता फोन आला की माझा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यानंतर आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून परत घरी जाण्याचा निर्णय घेतला व पुण्यात पोहोचल्यानंतर पुन्हा सर्व चाचण्या केल्या व सोबत स्वॅब ही दिला. याचा अहवाल निगेटिव्ह आला. दोन्ही लॅब या खासगी आहेत. एकाचा अहवाल पॉझिटिव्ह होता तर दुसऱ्याचा निगेटिव्ह.
याबाबत बोलताना आरोग्य राज्यमंत्र्यांनीही हा प्रश्‍नांची चौकशी करून तातडीने अहवाल सभागृहात सादर केला जार्इल असे सांगितले. दरम्यान या चर्चेत भाग घेत विरोधी पक्षनेते प्रवीण दकर म्हणाले की, एका चांगला मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला असून हा प्रश्‍न एका आमदाराच्या चाचणी अहवालाचा नसून राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यामुळे जनतेच्या मनात खरे रिपोर्ट..खोटे रिपोर्ट असा संभ्रम निर्माण होत आहे. यासाठी आम्ही मागणी करतो की सर्व चाचणी अहवालांची एकदा पुन्हा तपासणी करावी व राज्यात अशा प्रका रिपोर्ट देणारी रॅकेट आहेत की काय? हे शोधावे. जिथे जिथे संशय येत आहे तेथे तेथे तपासणी व्हावी. कारण एका रिपोर्टच्या चौकशीने हा प्रश्‍न सुटणार नाही.
दरम्यान यावर बोलातना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीचा निगेटिव्ह अहवाल एक दोन दिवसात पॉझिटिव्ह होणे शक्य आहे पण पॉझिटिव्ह असणाऱ्याचा निगेटिव्ह कसा होवू शकतो..हा खरा प्रश्‍न आहे. यासाठी गृह आणि आरोग्य विभागाने चौकशी करावी. पुण्यातील एक दोन खासगी लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर सदोष रिपोर्ट मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. मुंबईत जे. जे. रूग्णालय असो की पुण्यातील ससून अथवा महापालिका रूग्णालयात तपासणी केली असता अचूक अहवाल मिळतात असा अनुभव असल्याचे त्या म्हणाल्या.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!