तीर्थक्षेत्र पंढरीतील नामसंकीर्तन सभागृहास दहा कोटींचा निधी देण्यास नगरविकास मंत्री अनुकूल

पंढरपूर- शहरात बांधण्यात येत असलेल्या नामसंकीर्तन सभागृहाच्या बांधकामास दुसर्‍या टप्यात 10 कोटी रूपये निधी मिळण्याची आशा असून याबाबत नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
शहरात आदर्श शाळेलगतच्या नगरपालिकेच्या आरक्षण क्र.53 येथील प्रशस्त जागेत नामसंकीर्तन सभागृह उभारण्यात येत आहे. सध्या शहरात एकही सुसज्ज नाट्यगृह नसल्यामुळे या सभागृहाची निर्मिती सुरू आहे. सदर सभागृहामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास 1200 क्षमतेची आसन व्यवस्था, वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था, दर्शनी भागामध्ये पांडुरंगाची आकर्षक मूर्ती, संतांच्या मूर्ती आणि पालखी मार्गावरील महत्त्वाचे टप्पे याबाबतचे चित्र रेखाटण्यात येणार आहे.
भाविकांसाठी एक सभागृह उभे करण्याची संकल्पना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेपुढे प्रशांत परिचारक यांनी मांडली. यासाठी सन 2016 मध्ये पालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. सदर सभागृहाच्या पहिल्या टप्यातील कामास अभियांत्रिकी विद्यालय, पुणे यांचेकडून तांत्रिक मंजुरी व जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाले नंतर नगरपालिका वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विषेश अनुदान योजनेअंतर्गत मार्च 2017 मध्ये तत्काळ 10 कोटी रूपये निधी मिळून कामकाजही सुरु झाले. सध्या सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान सदर कामासाठी आजतागायत निधी उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदार व नगरपालिकेच्या सहकार्याने सदर कामकाज सुरु होते.
आता परिचारक यांनी एकनाथ शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून दुसर्‍या टप्यातील 10 कोटी मंजूर झाल्यास सदर कामास गती मिळेल अशी भावना व्यक्त केली होती. याबाबत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा परिचारक यांनी व्यक्त केली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!