पंढरपूरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहा दिवस लॉकडाऊन पुकारण्याची शिवसेनेची मागणी

पंढरपूर- शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी 10 दिवस लॉकडाऊन पुकारावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे निवेदन देवून करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन अतिशय शिस्तबध्दपणे विविध उपायोजना करीत आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात प्रशासकीय पातळीवर योग्य त्या उपायोजना करण्याबरोबरच अधिकारी, कर्मचारी व आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम करीत आहे यामुळे जून महिन्यापर्यंत स्थानिक रूग्ण आढळला नव्हता. मात्र जूनच्या सुरूवातीस येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळू लागले व आता ही संख्या पाचशेच्या जवळपास पोहोचली आहे. ही वाढती संख्या पाहता कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक असल्याने दहा दिवस पंढरपूरमध्ये लॉकडाऊन पुकारावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी केली आहे.
शिंदे म्हणाले की, पंढरपूर शहरातील जवळपास सर्वच उपनगरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर कोरोना रूग्ण आढळत असल्याने कंटेनमेन्ट झोन तयार करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. तर शहरातील अंतर्गत भागातही अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत .ही परिस्थीती अतिशय गंभीर असून दररोज रुग्णांचा वाढता आकडा पाहता जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर शहरात समूह संसर्गाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे पाहता पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व कोरोनाबाधित व्यक्तींची संपर्क साखळी तोडण्यासाठी तातडीने किमान 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करावा. या काळात अतिअत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करुन शहरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात अशी मागणी आम्ही केली आहे.
हे निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग सुधीर अभंगराव, शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवींद्र मुळे, पोपट सावतराव, विनय वनारे,अविनाश वाळके,सचिन बंदपट्टे, लंकेश बुराडे,तानाजी मोरे, अमित गायकवाड, पंकज डांगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!