रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे, दि. 9 : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेवून त्यानुसार योग्य कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खा. सुप्रिया सुळे, (व्हिसीव्दारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीष बापट, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, आमदार अतुल बेनके, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी शासन, प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून कोरोनासंकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावी, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा सुरळीत रहावा, अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.सुभाष साळुंखे म्हणाले, 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार अभियान राबविण्यात येत आहे.पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!