संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा: मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई दि 19: आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रारंभी लडाख येथे झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या अशा समयी आपण जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरु राहावी. आम्ही आमच्याकडून या प्रश्नी आवश्यक ते सर्व सहकार्य निश्चितपणे करू.

मुख्यमंत्री म्हणाले की,असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे की हिंदुस्थान चीन पेक्षा कमजोर आहे पण ही आता जुनी गोष्ट झाली. आमच्याकडेही सगळ्या शक्ती आहेत पण आपण कुणावर हल्ले करण्यासाठी उतावीळ नाहीत. आमचा भर नेहमी मुत्सद्देगिरी , चर्चा आणि संवादावर राहील पण याचा गैरफायदा कुणी घेणार असेल तर आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे.

कोरोनाच्या काळात संधीचा फायदा घेऊन चीन दबाव तंत्र खेळते आहे. आधीच कोरोना विषाणू साथीसाठी चीन जबाबदार आहे अशी संपूर्ण जगाची भूमिका असतांना स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा म्हणून चीन अशाही परिस्थितीत भांडण उकरून काढत आहे. त्यामुळे हे दबावतंत्र झुगारून देणे गरजेचे आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!