भीमा-नीरा खोर्‍यात पाऊस मंदावला, धरणांचे विसर्ग कमी केले

पंढरपूर – भीमा व नीरा खोर्‍यातील मागील तीन दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा धुमाकूळ आज कमी झाला असल्याने खडकवासला, वीर व अन्य धरणांमधून नद्यांमध्ये सुरू असणारे पाण्याचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत.
रविवार 25 जुलै सकाळपर्यंत मागील चोवीस तासात भीमा खोर्‍यातील मुळा मुठा उपखोरे व नीरा खोर्‍यातील धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेला असला तरी तो शंभर मिलीमीटरच्या आत आहे. मागील तीन दिवसात याच भागात दोनशे ते तीनशे मिलिमीटरची दिवसाला नोंद होत होती. भीमा उपखोर्‍यातील कलमोडीवर 53 मि.मी. तर घोड उपखोर्‍यात माणिकडोह 31, पिंपळगावजोगे 36, पवना 54, मुळशी 60, टेमघर 85, वरसगाव 67, पानशेत 60 मि.मी. तर नीरा नदीवरील गुंजवणी 25, देवघर 92 तर भाटघरवर 15 मि.मी. पावसाची नोंद आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत. खडकवासला 1550 क्युसेक तर वीरमधून निरेत 5228 ,वडीवळे 293, कलमोडी 1884, आंध्रा 1462 क्युसेक असे प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. वीरमधून पहाटेपर्यंत 21 हजार क्युसेकने पाणी सोडले गेले आहे. दरम्यान खडकवासला प्रकल्पातील विसर्ग कमी झाल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग 17 हजार 442 क्युसेक झाला आहे तर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग 47 हजार 814 क्युसेक इतका झाला आहे.
दरम्यान मागील तीन दिवसातील पावसाने धरणांमधील पाणीसाठे कमालीचे वधारले आहेत. उजनी धरण 25.25 टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे. याच बरोबर वीर 93, खडकवासला धरणात 84 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला साखळी धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ नोंदली गेली आहे.

अवघ्या ६० तासात उजनी “पंचवीशीत”

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!