पंढरपूर- मुळा मुठा साखळी धरणांवर होत असलेल्या पावसाने मागील प्रकल्पातून पाणी सोडल्याने खडकवासल्याचे दरवाजे उघडण्यात आले असून यातून 6 हजार 800 क्युसेक पाणी नदीत सोडले जात असल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढून 14 हजार 500 क्युसेक झाला आहे. दरम्यान पवना, चासकमान, आंध्रा व कलमोडीतूनही पाणी सोडले जात आहे. यामुळे याचा फायदा उजनीला होणार आहे. दौंडची आवक वाढत चालली असून ती बारा हजार क्युसेकच्या आसपास आहे तर धरण 68 टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे.
पवनामधून 2209 तर चासकमान धरणातून 1800 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. याच बरोबर भीमा व मुळा मुठा उपखोर्यात होत असलेल्या पावसामुळे उजनीकडे येणारी पाण्याची आवक वाढत चालली आहे. धरण मागील चोवीस तासात दोन टक्के वधारले असून आता ते आणखी झपाट्याने वधारेल व लवकरच ते टक्केवारीची पंच्चाहत्तरी पूर्ण करेल अशी आशा आहे. दरम्यान मुळा मुठा साखळी धरणांवर पाऊस होत असून तेथील धरण क्षमतेने भरल्याने वरसगाव व पानशेतमधून पाणी सोडले जात आहे जे थेट खडकवासल्यात येत असल्याने या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आता येथील सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
दरम्यान नीरा खोर्यात पावसाची हजेरी असून गुंजवणी 33, देवघर 59, भाटघर 26 तर वीरवर 24 मि.मी. पावसाची नोंद आहे. भाटघर व देवघर धरण भरले असल्याने यातून पाण्याचा विसर्ग पुढे वीरकडे येत आहे. नीरा खोर्यातील गुंजवणी, देवघर व भाटघर धरण शंभर टक्के भरली असून वीर ही 93 टक्के भरले आहे. हे धरण भरल्यानंतर यातून ही पाणी सोडले जाईल. सध्या भाटघर 5600 तर देवघर मधून 3500 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.