यंदा उजनी जलाशय सोडून भीमा- नीरा खोर्‍यावर पर्जन्यराजाची भरघोस कृपा

पंढरपूर- यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणावर एकूण 248 मि.मी. पाऊस झाला असून तो गतवर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. मात्र भीमा व नीरा खोर्‍यातील अन्य धरणांवर मात्र यावर्षी पर्जन्यराजा खूश असल्याचे दिसत आहे. येथे सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात नोंदला गेला आहे.
भीमा व नीरा खोर्‍यातील प्रकल्प आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. अनेक प्रकल्प शंभर टक्के झाले आहेत तर मोठी धरण पूर्णतः भरण्याच्या स्थितीत आहेत. सध्या तेथे पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्ट महिन्यात वरूणराजा तेथे मुसळधार बरसतो असा अनुभव आहे. दरम्यान मागील वर्षीच्या चांगल्या पावसाने यंदाचा पावसाळा सुरू होतानाही उजनी वगळता अन्य प्रकल्पात चांगला पाणीसाठा शिल्लक होता. यातच जून महिन्याच्या सुरूवातीला व जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात झालेल्या पावसाने तेथील प्रकल्प भरून पाणी सोडले गेले आहे. यामुळे उजनी धरण 53 टक्के भरले आहे. सध्या ही उजनीत रोज एक टीएमसी पाणी वाढत आहे.
मागील वर्षी 2 ऑगस्टपर्यंत उजनीवर 441 मिलीमीटर पावसाची नोंद होती तर यंदा 248 मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे. अन्य धरणांचा विचार केला तर खडकवासला धरणावर यंदा 483 मि.मी. ची नोंद आहे तर गतवर्षी 308 मि.मी. पाऊस याच कालावधीत झाला होता. काही धरणांचे यंदाचे 02 ऑगस्टपर्यंतचे व तुलनेत याच तारखेचे गतवर्षीचे पर्जन्य कंसात पुढील प्रमाणेः डिंभे 680(386), पानशेत 1573 (690), वरसगाव 1545 (651), पवना 1864 (502),चासकमान 436 (303), आंध्रा 893 (346), डिंभे 680 (386 ), नीरा खोरे देवघर 1712(554), भाटघर 501 मि.मी.(244 मि.मी.),
यंदाच्या टोकाला असणार्‍या धरणांवर पावसाचे प्रमाण कमी आहे. उजनीवर 1 जून पासून 248, नीरा खोर्‍यातील वीर प्रकल्पावर 241 तर घोड धरणावर 259 मि.मी. ची नोंद आहे. मागील वर्षी कडेच्या धरणांवर चांगला पाऊस झाला होता. उजनीवर प्रतिवर्षी पावसाळ्यात पाचशे ते साडेपाचशे मिलीमीटर पाऊस होतो मात्र 2021 मध्ये 1028 मि.मी. पावसाची येथे नोंद होती. ऑक्टोंबरपर्यंत वरूणराजा बरसत राहिला होता.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!