ताकद संस्कारांची : स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारानेच पांडुरंग परिवाराची यशस्वी घौडदौड, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वत्र आदरांजली

पंढरपूर- स्व. सुधाकरपंत परिचारक हे राज्याच्या राजकारण व सहकारातील एक चारित्र्यसंपन्न असे दुर्मिळ उदाहरण होते. सहकारी संस्थासाठी ते परिस होते कारण ज्यास हात लावला त्याचे सोने झाले. अनेकांचे संसार त्यांनी संस्थांच्या प्रगतीतून फुलविले. यामुळेच त्यांना सहकारतपस्वी असे म्हंटले जाते. पंतांना आपल्यातून जावून 17 ऑगस्ट रोजी एक वर्ष होत आहे. मात्र त्यांच्या पश्‍चात त्यांच्याच संस्कारात वाढलेल्या पांडुरंंग परिवारातील सर्वच संस्था यशस्वी काम करत आहेत. त्यांचा विचार हा या परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्यात रूजला आहे.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे मागील वर्षी 17 ऑगस्ट 2020 ला पुण्यात निधन झाले तेंव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. राजकारणातील संत म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंतांचे अचानक जाणे मनाला हुरहूर लावून जाणारे असे होते. परंतु दवाखान्यात उपचार घेत असतानाही त्यांनी आपले पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना ऊसबिलाचे हप्ता लवकर द्या असे बजावले होते व यासाठी ते स्वतः कार्यकारी संचालकांशी ही बोलत राहिले. अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकरी हाच त्यांचा केंद्रबिंदू राहिला म्हणूनच त्यांना जनतेने खूप प्रेम दिले. पाच टर्म आमदारकी दिली. पंतांवर जनतेचा खूप विश्‍वास होता. छोटी छोटी कामं घेवून लोक त्यांच्याजवळ येत व आपले समस्यांचे निराकरण करत.
राजकारण व सहकारात रमणारे पंत हे आध्यात्मिक होते. वारकरी संप्रदायाचा पगडा त्यांच्यावर होता. अनेक महात्म्यांचा सहवास त्यांना लाभला होता. मुळात खर्डी ही संत सीताराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी हेच त्यांचे मूळ गाव होते. यामुळे ते राजकारणासारख्या वादग्रस्त क्षेत्रात असतानाही नेहमीच चारित्र्यसंपन्न राहिले. जनतेसाठी आयुष्य वेचले. त्यांच्या हातात ज्या संस्था आल्या त्याचे सोने झाले. आज त्यांच्याच विचाराने श्री पांडुरंग ,युटोपियन, बाजार समिती , पंढरपूर अर्बन बँक यासह विविध संस्था अत्यंत सचोटीने चालविल्या जात आहेत. पंतांची शिकवण पांडुरंग परिवारात इतकी रूजली आहे की येथील कार्यकर्ते हे छोट्या मोठ्या संकटांनी खचून न जाता यावर समस्या शोधतात. सत्ता असो किंवा नसो परिचारक कुटुंबाला काहीच फरक पडत नाही कारण पंतांची पुण्याई इतकी मोठी आहे की त्यांना सत्ताधारी काय आणि विरोधक काय .. सारेच आपले मानतात. पंतांनी जवळपास 60 वर्षे राजकारण केले पण कधीची कोणाशी वैर पत्करले नाही. विरोधक ही त्यांना आपले मानायचे.


आता स्व.पंतांनंतर पांडुरंग परिवार त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांचे नातू प्रणव, रोहन, ऋषिकेश यांच्यासह डॉ. प्रीतीश हे सारेच समाजसेवेत कार्यरत आहेत. पंतांच्या प्रथम  पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नातवांनी विविध सामाजिक उपक्रम तालुकाभर राबविले आहेत. कर्मयोगी फांउडेशन असेल की प्रणव परिचारक युवा मंच यांच्यावतीने रक्तदान, व्याख्यानमाला, आरोग्य, नेत्ररोग तपासणी शिबिर पार पडत आहेत. पंतांनी ज्या पांडुरंग कारखान्याला राज्यात अग्रेसर साखर उद्योग बनविले त्या संस्थेत 400 जणांनी रक्तदान करून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली  आहे.
स्व.पंतांनी  श्री पांडुरंग परिवाराला दिलेले विचार व संस्कार इतके भक्कम आहेत की त्यांचे कार्यकर्ते याच वाटेवरून जात आहेत. राजकारण, समाजकारण असो की सहकार सर्वच ठिकाणी याची झलक पाहावयास मिळते. पंतांनी आपल्यातून जावून एक वर्ष लोटले असले तरी त्यांचे विचार  व संस्कार त्यांची आठवण सतत देत राहतात. खरा कर्मयोग पंतांनी आयुष्यभर पाळला. आपल्या कार्याने ते तालुक्याचे नव्हे तर सार्‍या महाराष्ट्राचे आदरणीय पंत बनले. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन..

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!