पावसाने ओढ दिल्याने राज्यात गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्के कमी जलसाठा, मध्यम व लघु योजनाही पावसाच्या प्रतीक्षेत

पंढरपूर – पुणे विभागासह राज्यातील विविध भागात पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच ओढ दिल्याने लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 57 टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी तो गतवर्षीच्या 2020 याच तारखेच्या ( 19 ऑगस्ट) तुलनेत दहा टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी सर्व प्रकल्पांमध्ये 67.34 टक्के जलसाठा होता. पावसाने ओढ दिल्याने मध्यम व लघु योजनांवर याचा विपरित परिणाम झाला आहे.

लघु व मध्यम योजनांवरच ग्रामीण भागातील शेती अवलंबून असते. छोटे व मोठे तलाव जुलैनंतर पावसाने ओढ दिल्याने भरलेले नाहीत. याचा परिणाम अनेक ठिकाणी मोठ्या धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडावे लागले आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील उजनीचाही समावेश आहे. हे धरण सध्या 62.44 टक्के भरले आहे तर गतवर्षी याच तारखेला यात 60.66 टक्के पाणीसाठा होता. उजनी धरण पुणे विभागातील पावसाने भरते. मात्र यंदा तेथे पावसाचा जोर नसल्याने ते अद्याप क्षमतेने भरलेले नाही.

जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने मोठ्या धरणांमध्ये जलसाठे झाले आहेत. यात मागील वर्षीच्या तुलनेत केवळ सहा टक्के पाणी कमी आहे. मात्र मध्यम व लघु योजनांवर पावसाने ऑगस्टमध्ये ओढ दिल्याने परिणाम झाल्याचे दिसत आहे.

राज्यातील सर्व 3267 योजनांची एकूण पाणीसाठवण क्षमता ही 48 हजार 586 दशलक्ष घनमीटर इतकी असली तरी सध्या यात 30 हजार 620 दलघमी पाणी साठले आहे. ( यात उपयुक्त जलसाठा क्षमता ही 40 हजार 779 दलघमीची असताना यात 23 हजार 488 दलघमी साठा उपयुक्त पातळीत आहे.) राज्यातील 141 मोठ्या धरणांमध्ये सध्या 70.25 टक्के पाणीसाठा आहे जो गतवर्षीच्या तुलनेत 6 टक्के कमी आहे. 2020 ला येथे याच तारखेला 76.19 टक्के जलसाठा होता.

मध्यम प्रकल्पांची संख्या राज्यात 258 इतकी असून यात केवळ 37.53 टक्के जलसाठा होवू शकला आहे. मागील वर्षी 19 ऑगस्टला या योजनांमध्ये जवळपास 63 टक्के पाणी साठले होते. तर महाराष्ट्रातील 2868 लघु योजनांची स्थिती कमी पावसामुळे बिकट असून यात आजच्या तारखेला केवळ 17.27 टक्के पाणी साठू शकले आहे. 2020 ला याच तारखेला 31 टक्के पाणी यात जमा झाले होते. ऑगस्टचा तिसरा आठवडा सुरू असून आता दमदार पावसाची प्रतीक्षा पुणे विभागासह अन्यत्र आहे. या भागात पावसाने ओढ दिल्याने लघु प्रकल्पांमध्ये केवळ 8.64 टक्के पाणी शिल्लक आहे तर मध्यम योजनांमध्ये 48 टक्के जलसाठा झाला आहे.

राज्यात सर्वाधिक पाणी (मोठी,लहान व मध्यम योजना) कोकण विभागात 76.83 टक्के साठले आहे. अन्य विभागाची आकडेवारी अमरावती 52.83 टक्के, औरंगाबाद 38.89, नागपूर 43.84, नाशिक 44.91, पुणे 72.59 टक्के.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!