कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पंढरपूर तालुक्याला सावरायला प्रशासन झटतयं, जनतेची साथ गरजेची

पंढरपूर- मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला मात्र या संसर्गाने पंढरपूर भागात खरा रंग दाखविला तो ऑगस्ट 2020 नंतर आणि पाहता पाहता हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला. पहिली लाट या भागासाठी खूप विदारक ठरली कारण अनेक मातब्बरांचे निधन झाले. यानंतर दुसर्‍या लाटेतही सर्वाधिक रूग्ण याच तालुक्यात सापडले आहेत. आता सर्वत्र अनलॉक होत असताना मात्र पंढरपूरच्या ग्रामीण भागात अजूनही रूग्णसंख्या जास्त असल्याने प्रशासन अक्षरशः जीवाचे रान करून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मंगळवारी ही सकाळपासूनच विविध गावांमध्ये चाचण्या घेतल्या जात होत्या.

सोलापूर जिल्हा ग्रामीणचा विचार केला तर अकरा तालुक्यात सर्वाधिक रूग्णसंख्या ही पंढरपूर तालुक्याची आहे. आपली वाटचाल तीस हजाराकडे सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या अहवालानुसार सोमवारपर्यंत 28 हजार 729 व यातच येथे काल आढळून आलेले 128 नवीन रूग्ण आहेत. याची नोंद आता आरोग्य विभागाकडे होईल. पंढरपूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 539 इतकी आहे जी जिल्ह्यात सर्वाधिक आहे. पहिल्या व दुसर्‍या लाटेत पंढरपूरकरांनी या संसर्गाचा समर्थपणे सामना केला आहे. शासन व प्रशासन एका बाजूला आजार थोपविणे आणि अर्थकारण चालविण्याचा प्रयत्न करत आहे. कडक निर्बंध कमी करून हळूहळू शिथिलता दिली जात असताना पुन्हा पंढरपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढले आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता सतत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे आता येथील जनतेने याचा विचार करणे गरजेचे बनले आहे.

कोरोनाची संख्या जिल्हयतील अन्य काही तालुक्यांमध्ये कमी झाली असली तरी माळशिरस, पंढरपूर भागात अद्यापही संख्या नियंत्रणात नसल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा ही चिंतेत आहे. सोमवार येथे जवळपास 3600 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज मंगळवारी ही शहरातील व्यापार्‍यांच्या तसेच ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. कोरोना रूग्ण शोधून त्यांच्या उपचार करणे व संसर्ग रोखण्याचा प्रयत्न आहे. आता या मोहिमेस नागरिकांन सहकार्य करणे गरजेचे बनले आहे.

प्रातांधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्यासह विविध विभाग व नगरपरिषदेचे अधिकारी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी त्यांचे सहकारी सतत यासाठी काम करत आहेत. अशा वेळी आता ग्रामीण व शहरी जनतेने नियम पाळून आपले आरोग्य जपणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या दोन लाटांनी पंढरपूरचे अर्थकारण कोलमडले असताना आता जर तिसर्‍या लाटेचा सामना करताना कडक निर्बंध लावले गेले तर आर्थिक स्थिती बिकट होवू शकते याचा विचार करून एका बाजूला अर्थकारण सावरणे व दुसर्‍या बाजूला कोरोनाविषयक नियम पाळून समन्वय साधण्यास प्राधान्य देण्याशिवाय आता पर्याय नाही.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!