आषाढीबाबत शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

पंढरपूर, दि.27:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले. पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, मानाच्या पालख्या 30 जून रोजी पंढरपूर येथे आपआपल्या मठात मुक्कामास येतील. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच , एक जुलै रोजी चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सर्व मानाच्या पालख्या आपआपल्या मठात विसावतील. दोन जुलै रोजी सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल मंदीर येथे दर्शनासाठी येतील. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या आपल्या गावी मार्गस्थ होतील.

कोरोनामुळे जगावर, देशावर तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. हे कोरोनाचे संकट लवकरात-लवकर दूर कर असे साकडे महाव्दार चौकातून श्री.विठ्ठल-रुक्मिणी चरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घातले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्री देशमुख दिली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!