दोन तपं रखडलेल्या सिंचन योजनेचे अखेर “ड्रोन सर्व्हेक्षण” सुरू, सांगोला तालुक्यात दुष्काळी पट्ट्यातील गावांना पाणी  देणारी योजना

पंढरपूर- सांगोला उपसा सिंचन योजनेला 1995 च्या युती सरकारच्या काळात मंजुरी मिळाली होती तर सन 2000 मध्ये आघाडी सरकारच्या काळात याचे भूमिपूजन झाले मात्र नंतर हा दुष्काळी भागात उजनीचे पाणी नेणारा प्रकल्प रेंगाळला. मात्र आता 2021 मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात लक्ष घातले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने याच्या लाभक्षेत्रात येणार्‍या गावांचा ड्रोन सर्व्हे सुरू झाला आहे. जवळपास दोन तपं ( चोवीस वर्षे) यासाठी लागली आहेत.
ज्या भागात पाणी कमी आहे तेथे पोहोचविण्यासाठी सरकार विविध योजना आखते मात्र अनेकदा प्रकल्प खूप रेंगाळतात व याचे उदाहरण म्हणजे सांगोला उपसा सिंचन योजना होय. उजनीतून दोन टीएमसी पाणी नेण्याची ही योजना असून जवळपास चोवीस वर्षे ती काम सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
आता या योजनेची किंमत सातशे कोटी रूपये झाली असून यामुळे सांगोला तालुक्यातील बारा गावातील पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. या योजनेसाठी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी खूप प्रयत्न केले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही यासाठी सहकार्य केले आहे. याबाबतच्या बैठका मुंबई, पुणे सिंचन भवन येथे सतत होत राहिल्या व अखेर शनिवार 4 सप्टेंबरपासून आता ड्रोन सर्व्हे लोटेवाडीपासून सुरू झाला आहे.
तालुक्यातील बारा वंचित गावे व कमी पाणी मिळणारी नीरा लाभक्षेत्रातील गावांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा इटकी, कटफळ, जुनी व नवी लोटेवाडी, चिक-महूद , खवासपूर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, लक्ष्मीनगर, अजनाळे, यलमार, मंगेवाडी या गावांना लाभ होणार आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी सुमारे सातशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!