पंढरपूर- गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे भीमा व नीरा खोर्यात पुनगरागम झाल्याचे चित्र असून मागील चोवीस तासात उजनीसह बहुतांश धरणांवर पावसाची किरकोळ व मध्यम स्वरूपाची हजेरी दिसून येत आहे. दरम्यान पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मागील चोवीस तासात रविवारी सकाळपर्यंत उजनीवर 15 मि.मी. पावसाची नोंद आहे. याच बरोबर मुळशी 51, टेमघर 30, पवना 29, वडीवळे 24, कलमोडी 17, वरसगाव 24, पानशेत 22, खडकवासला 12, कासारसाई 19, माणिकडोह 18, येडगाव 17 तर घोडवर 22 मि.मी. पावसाची नोंद आहे.
नीरा खोर्यात गुंजवणीवर 24 तर देवघर धरणावर 25 मि.मी.पावसाची नोंद आहे. दरम्यान पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा 3280 क्युसेकचा आहे तर दौंडमधून उजनीत येणारी आवक 2470 क्युसेकची आहे. नीरा नृसिंहपूर येथे भीमा नदी 3355 क्युसेकने वाहात आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणात सध्या 60.75 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून या प्रकल्पावर या पावसाळा हंगामात एकूण 356 मि.मी. पाऊस पडला आहे.