घर “रंगवायला” आला अन् पावणेसात लाखाला “चुना” लावून गेला

पंढरपूर- रंग देण्याचे काम करणार्‍या राजस्थानातील मंडी येथील एका कामगाराने सांगोला येथे रंगकाम सुरू असणार्‍या एका घरातून रोख रकमेसह पावणेसात लाखांचा ऐवज लंपास केले आहेत. याबाबत आता सांगोला पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी शिक्षक असणारे घरमालक नितीन शशिकांत गवळी ( रा. वासूद रोड) यांनी कामगार गणपतनाथ भवरनाथ (रा. मंडी, राजस्थान) याच्या विरोधात सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे.
सांगोला शहरातील वासूद रोडनजीक असणार्‍या बंगल्याचे पेंटिंग काम सुरू असलेल्या घरातील बेडरुमच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे 5 लाख 10 हजार रुपये आणि 1 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 6 लाख 75 हजारांचा ऐवज घेऊन हा रंग देणारा गायब झाला असल्याची घटना घडली आहे.
गवळी यांनी वासुद रोडला नवीन दुमजली बंगला बांधलेला आहे. बंगल्याचे रंगकाम सध्या चालू आहे. सदर काम शिवनाथ भवरनाथ यांना दिले होते. सध्या तो गावाकडे गेल्याने एक महिन्यापासून त्याचा भाऊ गणपतनाथ हा रंगाचे काम करीत होता. गवळी यांनी बंगल्यातील बेडरुममधील कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये हॉटेलमधील व्यवसायातून आलेली व गाळे भाड्याची रक्कम तसेच बांधकामाकरिता मित्राकडून उसने घेतलेली रक्कम असे मिळून 5 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम तसेच पत्नीचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण ठेवलेले होते. याची चावी बेडरुममधील दुसर्‍या कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती. तो ऐवज या पेंटरने लंपास केला आहे अशी घरमालकाची तक्रार आहे. दरम्यान या पेंटरने फोन बंद ठेवल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, पेंटर गणपतनाथ हा सांगोला येथून 25 लाख रुपये घेऊन गावाकडे गेल्याची चर्चा सांगोल्यामध्ये चालू असल्याचे फिर्यादी यांचा भाऊ महेश गवळी यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या भावास सांगितले. यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असताना रोकड व दागिने गायब झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी सांगोला पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!