हवामान खात्याचा अंदाज खरा ठरू दे रे देवा..! पावसाअभावी राज्यात 16 टक्के कमी पाणीसाठा  

पंढरपूर- महाराष्ट्राच्या लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा म्हणजे 2021 ला मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 16 टक्के पाणीसाठा कमी असून मध्यम व लघु प्रकल्पांची स्थिती तर दयनीय झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात चिंतेतचे वातावरण आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील चार दिवस पडेल असा वर्तविलेला अंदाज खरा ठरा ठरू दे रे ..देवा असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

राज्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये 43 तर लघु योजनांमध्ये केवळ 18 टक्के पाणीसाठा या पावसाळा हंगामात होवू शकला आहे. ही चिंतेची बाब आहे. मोठ्या धरणांमध्ये सध्या 73 टक्के जलसाठा शिल्लक असला तरी तो गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 13 टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी याच काळात राज्यात योजनांमध्ये 86 टक्के पाणी होते तर अनेक ठिकाणी नद्या ओव्हरफ्लो होवून वाहात होत्या. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने नद्यांची अवस्था पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी झाली आहे.

जून व जुलै महिन्यात पावसाने साथ दिली असली तरी ऐन श्रावणातच पर्जन्यराजाने महिनाभर ओढ दिली आहे. काही किरकोळ पाऊस वगळता सर्वत्र कोरडे वातावरण असून अनेक धरणांमधून शेतीसाठी पावसाळ्यात पाणी सोडण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणात मागील वर्षी याच तारेखला 92 टक्के पाणी होते तर यंदा मात्र धरण 62.16 टक्के स्थितीत आहे. हा प्रकल्प भरला तरच सोलापूर जिल्ह्यातील शेतीला उन्हाळा हंगामात पाणी मिळू शकते.

पुणे विभागातील अन्य धरणांचा विचार केला तर तेथे 82 टक्के पाणीसाठा आहे मात्र उजनीत 62 टक्के पाणी आहे. विभागाच्या तुलनेत 20 टक्के पाणी कमी आहे.

राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होणार्‍या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्‍चिम व मध्य भारतातून होणारा प्रवास या शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यातही अचानक वाढ

झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यांपर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!