उजनी जलाशय : पर्यटनकेंद्र विकसित करण्याच्या हालचालींना वेग, आराखडा होतोय तयार आणि निधीचीही तरतूद

पंढरपूर – महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पाणीसाठवण क्षमता असणार्‍या उजनी धरणाच्या जलाशयाचा परिसर हा निसर्गरम्य असून तो विस्तीर्ण आहे. याचा उपयोग पर्यटनासाठी केला जावू शकतो, याबाबतच्या हालचाली गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. आता येथील 43 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन केंद्र उभा करण्याच्या हालचाली सुरू असून याचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी सहा कोटी रूपयांचा निधी ही मंजूर झाला आहे.

उजनी जलाशयाची सीमा ही पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात आहे. या विस्तीर्ण जलाशयात पाण्याचा मृतसाठा हा 63 टीएमसी इतका असल्याने येथे पाणी सतत शिल्लक असतेच. या जलाशयावर पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथे फ्लेमिंगोसह विविध परदेशी पक्षी प्रतिवर्षी येत असतात. पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी असते. मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध असल्याने पक्षी या जलाशयाकडे आकर्षित होतात. येथे सध्याही पर्यटन सुरूच आहे. अनेकांनी आपल्या खासगी बोटी यासाठी तैनात केल्या आहेत.

उजनी जलाशय (यशवंतसागर) वर एक चांगले पर्यटन केंद्र उभारण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडली गेली होती. आघाडी सरकारच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पर्यटन विभागाचे काम होते तेंव्हा याबाबतची चाचपणी झाली होती. अधिकार्‍यांनी जलाशयाची पाहणी करून याबाबतचा अहवाल ही तयार केला होता. मात्र नंतर यास फारशी गती मिळाली नाही. नंतरच्या काळात उजनी जलाशयावर सर्वात मोठा सोलर प्रकल्प राबविण्याची तयारी फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आली होती. विस्तीर्ण जलाशयावरच सोलर पॅनल उभारण्याचा मानस होता. याबाबत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख हे आग्रही होते. मात्र या योजनेला ही नंतर ब्रेक लागला होता.

आता महाराष्ट्र विकास महामंडळाच्या मदतीने वन विभागामार्फत बीओटी तत्त्वावर पर्यटन केंद्र विकसित करण्याचे काम होणार असलची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र उभारण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. याला आता मूर्तस्वरूप प्राप्त झाले आहे. उजनी धरणासाठी यापूर्वीच संपादितकेलेल्या एकूण जमिनीपैकी 43 हेक्टर इतक्या जमिनीवर हे पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्रात बोटिंग, पक्षी निरीक्षण केंद्र, मनोरंजनाची साधने व अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.

या पर्यटन केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पर्यटन केंद्र सज्ज झाल्यानंतर ते बीओटी तत्त्वावर देण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्रामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतील. त्यानंतर त्या परिसरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. पर्यटकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!