खाकी वर्दीतील माणुसकी !, उपचारासाठी धावपळ आणि मृत्यूनंतर व्यापार्‍याचा साडेपाच लाख रू. ऐवजही ठेवला सुरक्षित


सोलापूर– हिरोळी- वागदरी सीमेवरील श्री भाग्यवंती देवीच्या मंदिरासमोर वागदरीकडे येणार्‍या रस्त्यावरून पायी जाणार्‍या एका 71 वर्षीय व्यापार्‍याचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. यावेळी तेथे तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी एस. आर. राऊत व ए. बी. राठोड यांनी या व्यापार्‍यास प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धावपळ तर केलीच मात्र त्यांच्याकडे असलेली साडेचार लाख रुपये रोकड  व एक लाखांची सुमारे 3 ते 4 किलो चांदीच्या वस्तू असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज सुरक्षित ठेवला.
शशिकांत गणपती एखंडे (वय 71, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) असे मृत व्यापार्‍याचे नाव आहे. या घटनेची उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ही खबर शेतकरी शिवकुमार इरय्या मठपती (वय 28, रा. वागदरी) यांनी दिली आहे. एखंडे यांना अचानक चक्कर आल्यानंतर 108 रुग्णवाहिका बोलावून घेऊन त्यावरील डॉ. उमेश कराळे यांनी तपासून पाहिले असता ते मृत झाल्याचे सांगितले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. त्यांच्या मोबाइल नंबरवरून नातेवाइकांना संपर्क साधण्यात आला. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी भेट दिली. मृताचा जागेवर पंचनामा करून रोख रक्कम व चांदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
वागदरी बॉर्डरवर असलेले पोलीस कर्मचारी एस. आर. राऊत, ए. बी. राठोड यांनी प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळवून देतानाच त्यांच्याकडील ऐवजाचे पण रक्षण केले, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल पुरस्कार मिळण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करणार असल्याचे उत्तर सोलापूरचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!