दुर्दैवी घटना : शेततळ्यातील पाण्यात बुडून दोघा बालक मित्रांचा मृत्यू , मंगळवेढ्यातील घटना

मंगळवेढा – मंगळवेढा-पंढरपूर महामार्गालगत असलेल्या शेततळ्यातत पोहोण्यासाठी गेलेल्या शहदाब अमजद रजबअली (शनिवार पेठ,वय 10 वर्षे), प्रज्वल हेमंत लोहार ( किल्ला भाग वय 11 वर्षे) या दोन बालक मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच नीट पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद झाली आहे.
दरम्यान, या दोन बालकांच्या मृत्यूमुळे मंगळवेढा शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची हकिकत अशी,यातील मयत प्रज्वल लोहार व शहदाब रजबअली हे दोघे नगरपालिकेच्या इयत्ता चौथी वर्गात शिकत होते. ते दोघे जीवलग मित्र असल्याने व अन्य मित्र वैभव विजय देसाई व शुभम लोहार असे चौघेजण गुरुवारी 12 रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान मंगळवेढा पंढरपूर रोडलगत खवतोडे यांच्या शेतात असलेल्या शेततळयात पोहण्यास गेले होते. शेततळ्यातील पाणी खोल असल्याने याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या मृत्यूची घटना वार्‍यासारखी संपूर्ण तालुकाभर पसरल्यानंतर पालकवर्गातून हळहळ व्यक्त होत होती. मयत शहदाब हा एकुलता एक मुलगा होता. याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची खबर हेमंत लोहार व असिफ दरवाजकर यांनी पोलिसात दिली असून याची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तुकाराम कोळी व पोलिस नाईक तळवार हे करीत आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!